यंदाच्या पर्वात सुसाट फॉर्मात असलेल्या दोन संघामंध्ये आज आयपीएल २०२१चा २२वा सामना खेळवला गेला.  रंगतदार झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय साकारला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर डिव्हिलियर्सने वादळी खेळी करत बंगळुरूला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने १२ धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डिव्हिलियर्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

दिल्लीचा डाव

बंगळुरूच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. लीगमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला शिखर धवनला काईल जेमीसनने तिसऱ्या षटकात बाद केले. वैयक्तिक ६ धावांवर धवनचा चहलने सीमारेषेवर झेल घेतला. धवननंतर आलेला स्टीव्ह स्मिथही धावा जमवण्यात अपयशी ठरला. मोहम्मद सिराजने स्मिथला बाद (४) केले. पॉवरप्लेच्या ६ षटकात दिल्लीने २ बाद ४३ धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेनंतर वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पृथ्वी शॉला माघारी धाडत दिल्लीला अजून एक धक्का दिला. शॉने २१ धावा केल्या.

तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार पंत आणि मार्कस स्टॉइनिस यांनी ४५ धावांची भागीदारी रचली. डावाच्या १३व्या षटकात हर्षल पटेलने स्टॉइनिसला बाद करत आपला दुसरा बळी घेतला. स्टॉइनिसने २२ धावा केल्या. यानंतर आलेल्या शिमरोन हेटमायरने १५व्या षटकात सिराजला षटकात ठोकत दिल्लीचे शतक फलकावर लावले. १५ षटकात दिल्लीने ३ बाद १११ धावा केल्या.  यानंतर पंत आणि हेटमायर यांनी आपल्या फलंदाजीचे स्वरुप बदलले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत आणि बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत सामन्याचे चित्र पालटले.  १९व्या षटकात हेटमायरने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात दिल्लीला १४ धावांची गरज होती, मात्र मोहम्मद सिराजने या षटकात १२ धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीकडून ऋषभ पंतने ६ चौकारांसह ५८ तर हेटमायरने २५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५३  धावांची खेळी केली. या विजयामुळे गुणतालिकेत बंगळुरूने अव्वल स्थान पटकावले आहे.

बंगळुरुचा डाव 

नाणेफेक गमावलेल्या बंगळुरूने २० षटकात ५ गडी गमावत १७१ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकात विराट कोहली (१२) आवेश खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशांत शर्माने देवदत्त पडीक्कलची (१७) दांडी गुल केली.  पॉवरप्लेच्या ६ षटकात बंगळुरूने २ बाद ३६ धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने रजत पाटीदारसोबत ३० धावांची भागीदारी रचली. आक्रमक खेळणाऱ्या मॅक्सवेलला अनुभवी अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. ९व्या षटकात मॅक्सवेल वैयक्तिक २५ धावांवर माघारी परतला.

रजत पाटीदार आणि एबी डिव्हिलियर्स यांनी १४व्या षटकात बंगळुरूचे शतक फलकावर लावले. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पाटीदारला अक्षर पटेलने तंबूचा मार्ग दाखवला. पाटीदारने ३१ धावा केल्या. त्यानंतर डिव्हिलियर्सने फटकेबाजी केली. १८व्या षटकात रबाडाने सुंदरला बाद करत बंगळुरुला संकटात टाकले. सुंदर बाद झाल्यानंतर डिव्हिलियर्यने अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात डिव्हिलियर्सने मार्कस स्टॉइनिसला २३ धावा कुटल्या. डिव्हिलियर्सने ४२ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. २० षटकात बंगळुरूने ५ बाद १७१ धावा फलकावर लावल्या.