आज आयपीएलमध्ये डबल हेडरचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगत आहे. यात नाणेफेक जिंकलेल्या हैदराबादने राजस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आयपीएलमधील पहिले शतक ठोकत हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अवघ्या ५६ चेंडूत बटलरने शतक साकारले. बटलरच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानने हैदराबादसमोर २० षटकात ३ बाद २२० धावा उभारल्या.

 

राजस्थानचा हैदराबादसमोर २२० धावांचा डोंगर 

राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये राशिद खानने यशस्वीला वैयक्तिक १२ धावांवर पायचित पकडले. त्यानंतर संजू सॅमसन आणि बटलरने राजस्थानचा डाव पुढे नेला. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये राजस्थानने १ बाद ४२ धावा केल्या. सुरुवातीला संयमी खेळणारा बटलर पॉवरप्लेनंतर आक्रमक झाला. त्याने आणि सॅमसनने हैदराबादच्या गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरुवात केली. या दोघांनी दीडशे धावांची भागीदारी रचली.

अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या सॅमसनला १७व्या षटकात विजय शंकरने माघारी धाडले. सीमारेषेवर अब्दुल समदने सॅमसनचा सुंदर झेल टिपला. सॅमसनने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. याच षटकात बटलरने आपले शतक पूर्ण केले. आक्रमक खेळणाऱ्या बटलरने १९व्या षटकात संदीप शर्माला २४ धावा चोपल्या, पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने ६४ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह १२४ धावांची खेळी केली.

आयपीएलमध्ये इंग्लंडच्या क्रिकेटपटूंची शतके

  • केव्हिन पीटरसन
  • बेन स्टोक्स (२)
  • जॉनी बेअरस्टो
  • जोस बटलर