यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करणारा वेगवान गोलंदाज चेतन साकारियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चेतनचे वडील कांजीभाई साकारिया यांचे करोनामुळे निधन झाले आहे. करोनाची लागण झाल्यानंतर चेतनचे वडील रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

आयपीएलच्या स्थगितीनंतर चेतन वडिलांच्या उपचारासाठी घर आणि रुग्णालयाच्या चक्कर मारत होता. चेतनला आपल्या वडिलांसाठी घर बांधायचे होते. परंतु त्याची इच्छा अपूर्ण राहिली.

 

आयपीएल २०२१च्या लिलावात चेतनची बेस प्राईस २० लाख रुपये इतकी होती. मात्र राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १.२ कोटी रुपयांत संघात घेतले होते. त्यानंतर राजस्थानकडून खेळताना चेतनने शानदार कामगिरी केली. ”जेव्हा लोक आयपीएल स्थगित करण्याविषयी बोलत होते, तेव्हा मला माझ्या मानधनाचा मोठा हिस्सा मला यापूर्वीच मिळाला होता, या पैशातून मी माझ्या वडिलांवर उपचार केले. मी कुटुंबातील एकमेव व्यक्ती होतो, जो पैसे कमावत होतो आणि क्रिकेट हेच माझ्या उत्पन्नाचे एकमेव स्त्रोत आहे. दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वडिलांना ज्या रुग्णालयात दाखल केले होते, त्या रूग्णालयाच्या बाहेरील बाकावर मी बसून राहायचो.”

चेतनचा राजस्थान रॉयल्स संघापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही खडतर आहे. चेतनचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. त्यानंतर ते गुजरातमध्ये टेम्पो चालवू लागले. तेव्हा चेतनकडे खेळण्यासाठी आवश्यक वस्तूही नव्हत्या, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. भावसिंहजी क्रिकेट अकादमीने चेतनला क्रिकेट शिकवण्याची फी सुद्धा घेतली नव्हती. त्यामुळे मी आता इथवर येऊन पोहोचलो आहे, असेही तो सांगण्यास विसरला नव्हता.

चेतनचे पदार्पण आणि कामगिरी

चेतनने २०१७-१८ सालच्या विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पदार्पण केले होते. जडेजा फिट नसल्याने त्याला संधी मिळाली होती. त्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र जडेजाने त्याचे मनोबळ वाढवले आणि पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरत दोन गडी बाद केले. चेतनने घरच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत १६ टी-२० सामना खेळले आहेत आणि त्यात त्याने २८ गडी बाद केले आहेत. ११ धावा देत ५ गडी बाद केल्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.