चेन्नईत रंगलेल्या आयपीएल 2021च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या बाजूने लागल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर कोलकाताने 20 षटकात 6 बाद 187 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटकात 5 बाद 177 धावांपर्यंत मजल मारता आली.  हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली. मात्र, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

हैदराबादचा डाव

कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकात  सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नर यष्टीपाठी झेल देऊन माघारी परतला. प्रसिध कृष्णाने वॉर्नरची विकेट घेतली. त्यानंतर शाकिब अल हसनने वृद्धिमान साहाची दांडी गुल करत हैदराबादला संकटात टाकले. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादला सांभाळले. 8व्या षटकात हैदराबादने आपले अर्धशतक साकारले. बेअरस्टो आणि पांडे यांनी उपयुक्त भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. 12व्या षटकात बेअरस्टोने आपले अर्धशतक पूर्ण केले.  अर्धशतकानंतर बेअरस्टो कमिन्सच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला नबी 14 धावांची भर घालून कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दुसऱ्या बाजुला असलेल्या मनीष पांडेेने अर्धशतक झळकावले. अपेक्षित धावा आणि चेंडू यांच्यातील वाढणारे अंतर पाहता विजय शंकर आणि मनीष पांडेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. रसेलच्या षटकात विजय शंकर झेल देऊन माघारी परतला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा मावळल्या. मनीष पांडेने 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 61 धावांची खेळी केली. कोलकाताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 2 बळी घेतले.

कोलकाताचा डाव

केकेआरकडून शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी सलामी दिली. नितीश राणाने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. भुवनेश्वर, संदीप शर्मा आणि टी. नटराजन या हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत या दोघांनी पहिल्या पाच षटकात 45 धावा उभारल्या. त्यानंतर या दोघांनी सहाव्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. दोघांची फलंदाजी बघता वॉर्नरने राशिद खानच्या हाती चेंडू सोपवला. राशिदनेही पहिल्याच षटकात शुबमन गिलला वैयक्तिक 15 धावांवर बाद केले. शुबमन बाद झाल्यानंतरही राणाने आपली हाणामारी सुरूच ठेवली आणि 37 चेंडूत अर्धशतक झळकावले.

नितीश राणाने राहुल त्रिपाठीला सोबत घेत 12व्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. त्यानंतर राहुलनेही आक्रमक पवित्रा धारण करत 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर राहुल नटराजनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. राहुलनंतर आलेला आंद्रे रसेल संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाईल असे वाटत होते. मात्र, राशिद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याला अवघ्या 5 धावा करता आल्या. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात राणा बाद झाला. राणाने 54 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 80धावा केल्या. राणानंतर मॉर्गनही स्वस्तात माघारी परतला.  मोहम्मद नबीने या दोघांना लागोपाठ चेंडूंवर बाद केलेे.  दिनेश कार्तिकने 9 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी केल्यामुळे कोलकाताला दोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. हैदराबादकड़ून  राशिद खानने 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. नबीलाही दोन बळी घेता  आले.

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत आयपीएलचे एकदा विजेतेपद जिंकले आहे, तर केकेआरने दोन विजेतेपदे नावावर केली आहेत. गेल्या 5 वर्षांपासून हैदराबाद संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे, तर केकेआरचा संघ गेल्या मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

 प्लेईंग XI

सनरायझर्स हैदराबाद- डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अब्दुल समद, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी. नटराजन, संदीप शर्मा.

कोलकाता नाइट रायडर्स – ईयॉन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, राहुल त्रिपाठी,  नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, हरभजन सिंग,  पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, प्रसिध कृष्णा.