भारतात करोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली असून पुरेशा सुविधांबाबतही चिंता निर्माण झाली आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात बरीच अडचण निर्माण झाली आहे. काही क्रिकेटपटूंनी देणगी देऊन देशातील आरोग्य संरक्षण सुविधांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि बंगालचा क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीही या कठीण परिस्थितीत मदतीसाठी हात उंचावलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला आहे.

ipl 2021 sunrisers hyderabad player shreevats goswami donates 90k oxygen supplies
श्रीवत्स गोस्वामी

 

सनरायझर्स हैदराबादच्या या यष्टिरक्षक फलंदाजाने ९० हजार रुपयांचे योगदान दिले आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी गोस्वामीने डोनेटकार्ट चॅरिटेबल सोसायटीसाठी योगदान दिले आहे. ही देणगी दिल्यानंतर संस्थेने ट्विटद्वारे गोस्वामीचे कौतुक केले आहे. डोनेटकार्टने सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण, कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून टॅग केले आहे. ”गरजेच्या वेळी ९० हजार रुपयांचे योगदान दिल्याबद्दल श्रीवत्स गोस्वामी यांचे आभार”, असे ट्विट डोनेटकार्टने केले आहे.

 

३१ वर्षीय श्रीवत्स गोस्वामी आयपीएल २०२१मध्ये सनरायझर्स हैदराबादचा एक भाग आहे, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. गोस्वामीने ट्विट करुन लोकांना आवाहन केले आहे, की ते स्वयंसेवी संस्था किंवा चॅरिटीला देणगी देऊ शकतात. देणगी घेऊन देशभरातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यास मदत करणार्‍या बर्‍याच संस्था आहेत.

पॅट कमिन्स आणि ब्रेट लीची भारताला मदत

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने भारतातील करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ३७ लाखांची मदत केली. कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने मदतीचा हात पुढे केला. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. या आवाहनानंतर लीने भारताला मदत केली आहे.