आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. मुंबईसोबत दिल्ली, बंगळुरु आणि हैदराबाद या तीन संघांनी प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं होतं. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यंदाच्या हंगामातला प्रवास फारसा चांगला झाला नाही. स्पर्धेच्या मध्यावधीत कर्णधार दिनेश कार्तिकने राजीनामा देत मॉर्गनकडे संघाची कमान सोपवली. परंतू या नेतृत्वबदलाचाही संघाच्या कामगिरीवर फारसा परिणाम झाला नाही.

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने भविष्याचा विचार करता KKR ने युवा शुबमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवावं असं मत मांडलं आहे. “शुबमन गिलकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं कर्णधारपद सोपवायला हवं. पुढील ३ वर्षांचा विचार करुन KKR ला संघबांधणीची गरज आहे. ओएन मॉर्गनकडे संघाचं कर्णधारपद जावं असं मला वाटत नाही, तो परदेशी खेळाडू आहे. त्याचा इतर कामासाठी वापर होऊ शकतो.” आकाश चोप्रा आपल्या आकाशवाणी या कार्यक्रमात बोलत होता.

शुबमन गिलच्या भोवती संघाची उभारणी व्हायला हवी. दिल्लीने श्रेयस अय्यरला संधी देत ज्या पद्धतीने संघ उभा केला त्याचा आदर्श कोलकात्याने ठेवायला हवा, असं मत आकाशने व्यक्त केलं. आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई विरुद्ध हैदराबाद या अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईचा संघ जिंकला असता तर कोलकात्याला प्ले-ऑफचं तिकीट मिळालं असतं. परंतू हैदराबादने मुंबईवर मात करत कोलकात्याचं तिकीट कापलं.