सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ तळाच्या स्थानावर विजयासाठी झगडणाऱ्या सनरायजर्स हैदराबादशी बुधवारी सामना करणार आहे.

सलामीचा सामना गमावल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी बजावताना सलग चार सामने जिंकले. फिरोझशाह कोटला स्टेडियमवरही हीच विजयी अनुकूलता कायम राहील, अशी चेन्नईची अपेक्षा आहे. तीन वेळा ‘आयपीएल’ विजेत्या चेन्नईला गत हंगामात समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. परंतु अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईने यंदा क्षमतेनुसार कामगिरी केली आहे.

हैदराबादला पंजाब किंग्जविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला आहे. बाकी पाचपैकी चार सामने त्यांनी गमावले आहेत. हैदराबादची आघाडीची फळी दिमाखदार कामगिरी करीत आहे, पण मधली फळी अपेक्षेनुसार कामगिरी करीत नसल्याने हैदराबादचा संघ बऱ्याचदा अपयशी ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

जडेजावर भिस्त

चेन्नईच्या यशोदायी प्रवासात अष्टपैलू रवींद्र जडेजाचा सिंहाचा वाटा आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या लढतीत हर्षल पटेलने चमकदार कामगिरी केली. सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांना सूर गवसला आहे. सुरेश रैना आणि अंबाटी रायुडू मोठ्या खेळीच्या प्रतीक्षेत आहेत.

सनरायजर्स हैदराबाद

परदेशी खेळाडू लयीत

चेन्नईच्या फलंदाजांना रशीद खानच्या धोकादायक गोलंदाजीची जाणीव आहे. हैदराबादच्या अन्य खेळाडूंना लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. हैदराबादचा संघ प्रामुख्याने कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सलामीवीर जॉनी बेअरस्टो, न्यूझीलंडचा संघनायक केन विल्यम्सन आणि रशीद या परदेशी खेळाडूंवर विसंबून आहे.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी