आयपीएल २०२१ स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून माजी क्रिकेटपटू वसीम जाफरच्या कोड्यात टाकणाऱ्या पोस्ट चर्चेत आहेत. प्रत्येक सामन्यापूर्वी एक कोडं टाकण्याची त्याने मालिकाच सुरु केली आहे असं दिसतंय. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यांपूर्वी त्याने नेटकऱ्यांना बुचकळ्यात टाकणारी कोडी टाकली होती. जाफर सामना सुरू होण्यापूर्वी त्या कोड्यांची उत्तरंही देतो. मात्र उत्तर मिळेपर्यंत नेटकरी वेगवेगळी गंमतीशीर उत्तरं देतात. शेवटी उत्तर मिळालं की, हा खेळाडू होता का? असं क्लिक होतं. सनराइजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइटराइडर्स सामन्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा कोड्यात टाकणारी पोस्ट केली आहे आणि खेळाडू ओळखण्याचं आव्हान केलं आहे.

पहिल्या फोटोत जिलेबी तळतानाचा फोटो टाकला आहे. यावरुन नेमका खेळाडू कोण असेल याबाबत नेटकऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. तर दूसऱ्या फोटोत ‘HOW DO FISH BREATHE IN WATER?’असा मजकूर असलेल्या माशाचा फोटो शेअर केला आहे. या दोन फोटोवरून नेटकरी दोन्ही संघातील खेळाडुंची नावं सांगत आहेत. मात्र नेमकं दिलेलं उत्तर बरोबर की चूक यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी ‘एडिट करके तुने इमेज मेरा मेमे बना दिया, मेहनत करके तेरे भाई ने पुरा ड्रीम बना दिया’ असं लिहिलं होतं. तर दूसऱ्या बाजुला ‘HUGSY’असं इंग्रजीत लिहून पेंग्विनचं कार्टून पोस्ट केले होतं. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी हे दोन खेळाडू पृथ्वी शॉ आणि सुरैश रैना असल्याचं त्याने सांगितलं.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यापूर्वी जाफरने फ्लेमिंगोचा फोटो ट्वीट केला होता आणि हा खेळाडू कोण असा प्रश्न विचारला होता. हा खेळाडू वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट असल्याचं त्याने सांगितलं.