इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणाऱ्या संघर्षात वरचढ कोण ठरणार, याची उत्कंठा लागली आहे.

दिल्लीविरुद्ध तिसऱ्या सलग विजयाची आशा राखायची असेल, तर मुंबईला मधल्या फळीच्या कमजोरीवर मात करावी लागेल. मुंबईने दीडशेनजीक धावसंख्येचे रक्षण करून हे दोन विजय मिळवले आहेत. दिल्लीने गेल्या आठवड्यात राजस्थानला नमवले, तर रविवारी पंजाब किंग्जवर सहा गडी राखून आरामात विजय मिळवला.

मुंबई इंडियन्स

रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा संघाला चांगली सुरुवात करून देत आहे, परंतु मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरत आहे. क्विंटन डी कॉकलाही हा कित्ता गिरवायला हवा. मुंबईकडे सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक आणि कृणाल पंड्या बंधू असे एकापेक्षा एक आक्रमक फलंदाज आहेत, पण तरीही मुंबईला मोठी धावसंख्या रचता आलेली नाही. मधल्या षटकांमध्ये धावांचा वेग वाढवण्याची गरज आहे, असे हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितने कबूल केले. जसप्रित बुमराच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याने फलंदाजांनी उभारलेल्या माफक धावसंख्येचेही धीराने रक्षण केले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (एकूण ६ बळी) हाणामारीच्या षटकांमध्ये कर्दनकाळ ठरत आहे. लेग-स्पिनर राहुल चहरने दोन सामन्यांत ७ बळी घेत प्रभाव दाखवला आहे. हैदराबादविरुद्ध अ‍ॅडम मिल्नेला संधी मिळाली, परंतु दिल्लीविरुद्ध ऑफ-स्पिनर जयंत यादव अधिक उपयुक्त ठरेल.

दिल्ली कॅपिटल्स

स्मिथला अखेरची संधी?

सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर शिखर धवनला (एकूण १८६ धावा) दिल्लीच्या यशाचे प्रमुख श्रेय जाते. युवा पृथ्वी शॉ याची त्याला अप्रतिम साथ मिळते आहे, परंतु चेन्नईविरुद्ध ७२ धावा करणाऱ्या पृथ्वीला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात नंतरच्या सामन्यांत अपयश आले. दिल्लीने पंजाबविरुद्ध स्टीव्ह स्मिथला संधी दिली, परंतु त्याला ९ धावाच करता आल्या. दिल्लीला पुढील सामना चेपॉकवर खेळायचा आहे. त्यामुळे स्मिथला या संधीचे सोने करता आले नाही, तर दिल्ली पुन्हा अजिंक्य रहाणेचा पर्याय वापरू शकेल. कर्णधार ऋषभ पंतकडे कोणत्याही गोलंदाजीच्या माऱ्याला सामोरे जाण्याची क्षमता आहे. मागील वर्षी अंतिम सामन्यात मुंबईकडून पराभव पत्करणाऱ्या दिल्लीला आघाडीच्या फळीकडून मोठ्या धावसंख्येच्या अपेक्षा आहेत. दिल्लीकडे मार्कस स्टॉइनिस, ललित यादव यांच्यासारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. याशिवाय कॅगिसो रबाडा, ख्रिस वोक्स, आनरिख नॉर्किए यांच्यावर वेगवान माऱ्याची धुरा आहे. तसेच अनुभवी रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, प्रवीण दुबे आणि शाम्स मुलानी हे फिरकीचे पर्याय उपलब्ध आहेत.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी