ग्लेन मॅक्सवेल प्रत्येक सामन्यागणिक अधिक धोकादायक सिद्ध होतोय. त्याला डेव्हिड मिलरकडून तितक्याच तोलामोलाची साथ मिळते आहे. त्यामुळे शनिवारी कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
आयपीएलच्या सातव्या मोसमातील पहिल्या सामन्यापासून मॅक्सवेल आपल्या वादळी खेळींनिशी सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर त्याच्या आक्रमणाची आता चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांत या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने १७ षटकार आणि २८ चौकारांची आतषबाजी करीत ९३च्या सरासरीनिशी एकंदर २७९ धावा काढल्या आहेत. शनिवारी कोलकाताचा जादूई फिरकी गोलंदाज सुनील नरिनचे आव्हान मॅक्सवेलपुढे असेल. जगातील अनेक दिग्गज फलंदाजांची नरिनला सामना करताना तारांबळ उडते. त्यामुळेच मॅक्सवेल-नरिन लढत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोलकाता संघाकडे गुणवत्ता आणि अनुभव या दोन्ही गोष्टींचा भरणा आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसकडे कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटवण्याची क्षमता आहे.
संघ
किंग्ज इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड मिलर, मनन व्होरा, वीरेंद्र सेहवाग, मिचेल जॉन्सन, चेतेश्वर पुजारा, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, थिसारा परेरा, ग्लेन मॅक्सवेल, रिशी धवन, अनुरित सिंग, संदीप शर्मा, अक्षर पटेल, ब्युरान हेंड्रिक्स, करणवीर सिंग, मुरली कार्तिक, शिवम शर्मा, शार्दूल ठाकूर, लक्ष्मीपती बालाजी, परविंदर अवाना, गुरकिराटसिंग मान, मनदीप सिंग.
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नरिन, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, उमेश यादव, विनय कुमार, मॉर्नी मॉर्केल, पीयूष चावला, मनीष पांडे, वीर प्रताप सिंग, ख्रिस लिन, आंद्रे रसेल, एस. एस. मंडल, पॅट कमिन्स, देवव्रत दास, सूर्यकुमार यादव, मानविंदर बिस्ला, रयान टेन डोइश्चॅट, कुलदीप यादव.