आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या सुनावणी सोमवारी दिल्ली न्यायालयाने 25 जुलैपर्यंत लांबणीवर टाकली. क्रिकेटपटू एस.श्रीशांत, अंजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यासह एकूण ४२ आरोपींवर आज पटीयाला हाऊस कोर्टात आरोपांची निश्चिती होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने सुनावणी २५ जुलैपर्यंत लांबणीवर टाकली. आरोपींमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांचाही समावेश आहे.
दिल्ली पोलिसांनी आयपीएलच्या सहाव्या मोसमात स्पॉट फिक्सिंग विषयीचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलेले आहे. या प्रकरणात आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बंसल कृष्णा यांनी आजची तारीख निश्चित केली होती. पण, आता सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. निकाल पत्र अद्याप तयार नसल्याचे न्यायालयाकडून यावेळी सांगण्यात आले. २५ जुलै रोजी या प्रकरणाचा फैसला लागणार असून तोपर्यंत प्रकरणाशी संबंधित स्पष्टीकरण देण्याचीही मुभा असणार आहे.