आयपीएल म्हटलं की चौकार आणि षटकारांचा वर्षांव ठरलेला, पण सातव्या हंगामाच्या ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात पावसाचाच धुवाँधार खेळ पाहायला मिळाला. जोरदार पावसामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना होऊ शकला नसला, तरी हा सामना राखीव दिवशी (बुधवार) खेळवण्यात येणार आहे. पण राखीव दिवशीही हा सामना होऊ शकला नाही, तर गुणतालिकेत सरस असल्याच्या कारणास्तव पंजाबचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
मंगळवारी सव्वा पाच वाजेपर्यंत मैदानावरील पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि त्यानंतर सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला. यावेळी जर एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला तरच तिकीटधारकांना पैसे परत देण्यात येणार आहेत.

उद्या काय आणि कसे घडू शकेल
– दुपारी ४ वाजता सामन्याला सुरुवात करण्यात येईल.
– जर पावसाचा जोर कायम राहिला तर रात्री ९.३० पर्यंत वाट पाहिली जाईल.
– किमान प्रत्येकी पाच षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो.
– पावसामुळे जर सामना रद्द झाला, तर गुणतालिकेतील अव्वल गुणांनुसार विजेता ठरवला जाईल.
– गुणतालिकेत पंजाबचे २२ आणि कोलकात्याचे १८ गुण आहेत, त्यानुसार पंजाबच्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.