वानखेडे या आपल्या बालेकिल्ल्यावर मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १५ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे नशीबाने सरासरीची समिकरणे जुळली, तर स्पर्धेच्या अंतिम चार संघात सामिल होण्याच्या मुंबईच्या आशा अजूनही कायम आहेत.
मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर विजयासाठी १७४ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना दिल्ली संघाने सुमार फलंदाजी केली.
केवीन पीटरसन, दिनेश कार्तिक, मुरली विजय हे तगडे फलंदाज तंबूत परतले आहेत. मनोज तिवारी आणि जे.पी.ड्युमिनी यांनी सावध फलंदाजी करत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला पण, अपेक्षित सरासरीने धावसंख्या होत नसल्यामुळे अखेच्या षटकांमध्ये दिल्लीसमोर विजयासाठी बक्कळ धावसंख्या हव्या होत्या. त्यामुळे जलद धावा करण्याच्या घाईत मनोज तिवारीही १८ व्या षटकात बाद झाला. त्यामुळे त्याच्या संयमी खेळीचा फायदा दिल्लीला झाला नाही आणि अखेरीस मुंबईने १५ धावांनी सामना जिंकला.
मुंबई इंडियन्स संघाकडून दमदार सुरूवात करताना सलामीवर लेंडल सिमन्स आणि मायकल हसी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांकडून तुफान फटकेबाजी होत असताना दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या इमरान ताहेरच्या फिरकी चेंडूवर बाद झाला आणि सलामीजोडीच्या ८७ धावांच्या भागीदारीत भेद पडला. दुसऱया बाजूला मायकल हसी या सामन्यात चांगलाच फॉर्मात आला त्याने ताबडतोड ५६ धावांची खेळी केली. मायकल हसी धावचित झाला.
हसी तंबूत परतल्यावर मैदानावर आलेल्या पोलार्डने आल्या आल्याच आपने मनसुबे दाखविण्यास सुरूवात केली. त्याने पहिल्याच चेंडूत उत्तुंग षटकार खेचला. त्यानंतर जलद धावा करण्याच्या नादात मुंबईच्या विकेट्स एकामागोमाग पडू लागल्या आणि संघाला सर्वबाद १७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. संघाच्या फलंदाजीला ज्यापरिने सुरुवात झाली होती त्याच्याशी तुलना करता मधल्यापट्टीतील फलंदाजांनी केलेल्या कमकुवत कामगिरीमुळे १७३ धावांवरच संघाला समाधान मानावे लागले होते.
स्पर्धेच्या अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने आजचा सामना जिंकणे मुंबईसाठी अतिशय महत्वाचे होते.

सध्याची धावसंख्या-
दिल्ली डेअरडेव्हिल्स- १५८/४ (२० षटके)
मुंबई इंडियन्स- सर्वबाद १७३  ( १९.३ षटके)