News Flash

मुंबई, चेन्नई, राजस्थानचे जैसे थे; दिल्लीत मात्र ‘आप’ली मर्जी

आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी गतअनुभवावरून मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स यांनी नियमांचा पुरेपूर फायदा उचलत पाच क्रिकेटपटूंना संघात कायम ठेवण्याची खेळी साधली.

| January 11, 2014 05:03 am

आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी गतअनुभवावरून मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स यांनी नियमांचा पुरेपूर फायदा उचलत पाच क्रिकेटपटूंना संघात कायम ठेवण्याची खेळी साधली. तर दुसरीकडे दिल्लीच्या राजकारणात बरेच फेरबदल झाले असले तरी दिल्ली डेअल डेव्हिल्स संघाने मात्र ‘आप’ली मर्जी राखत एकाही खेळाडूला कायम ठेवलेले नाही. या चालीमुळे भरपूर पैसा ओतूनही जेतेपदाला गवसणी न घालता आलेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्सला येत्या वर्षांमध्ये नवीन संघाची बांधणी करता येईल. त्यामुळे त्यांचा नवा गडी आयपीएलमध्ये नवीन राज्य निर्माण करणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक जेतेपदे मिळवणाऱ्या बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या चेन्नईच्या संघाने पाच खेळाडू कायम ठेवले आहेत. यामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो यांना संघात कायम ठेवले आहे, तर मुरली विजय, अ‍ॅल्बी मॉर्केल आणि फॅफ डय़ू प्लेसिस यांना संघात कायम ठेवलेले नाही. गतविजेत्या मुंबईच्या संघाने विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माला कायम ठेवले आहे. त्याचबरोबर हरभजन सिंग, अंबाती रायुडू या भारतीय खेळाडूंना आणि लसिथ मलिंगा व किरॉन पोलार्ड या विदेशी क्रिकेटपटूंना संघात कायम ठेवले आहे.
राजस्थान रॉयल्समधून राहुल द्रविडने निवृत्ती पत्करल्यावर शेन वॉटसनला कर्णधारपद देण्यात येणार असल्याने त्याच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरला राजस्थानने संघात कायम ठेवले आहे. तर गेल्या काही मोसमांमध्ये संघाचा चेहरा बनलेला अजिंक्य रहाणेबरोबर संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी यांनाही कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार विराट कोहलीसह ख्रिस गेल आणि ए बी डि व्हिलियर्स यांना कायम ठेवले आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन क्रिकेटपटूंना कायम ठेवत चाणाक्षपणे आपली खेळी खेळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 5:03 am

Web Title: ipl 7 mi rr csk eye retentions delhi daredevils set to start fresh
Next Stories
1 शिकाऱ्याचीच शिकार!
2 सेरेना विल्यम्स विक्रमी जेतेपद पटकावणार?
3 बोपण्णा-कुरेशीची अंतिम फेरीत धडक