बाद फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण लढतीत सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या विजयामुळे बाद फेरीत आगेकूच करण्याच्या सनरायजर्सच्या आशा जिवंत आहेत तर बंगळुरूला बाद फेरीसाठी अन्य संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवनची शतकी सलामी सनरायजर्सच्या विजयाचे वैशिष्टय़  ठरले. बंगळुरूने दिलेले १६१ धावांचे आव्हान सनरायजर्सने याच खणखणीत सलामीच्या जोरावर पेलले. आतापर्यंतच्या लढतीत शिखर धवन आणि आरोन फिंच सलामीला येत होते. मात्र त्यांना अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने धवनच्या जोडीला वॉर्नरचा पाठवण्याचा निर्णय सनरायजर्स व्यवस्थापनाने घेतला. हा निर्णय योग्य असल्याचा प्रत्यय या विजयाने दिला.
धवन-वॉर्नर जोडीने १०० धावांची सलामी दिली. ५० धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. त्यानंतर वॉर्नरला वरुण आरोनने बाद केले. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावा केल्या. नमन ओझाने २४ धावा केल्या. आरोन फिंच आणि डॅरेन सॅमीने आक्रमक खेळ करत सनरायजर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १६० धावांची मजल मारली. ख्रिस गेल १४ धावा करून तंबूत परतला. युवराज सिंगने २१ तर एबी डीव्हिलियर्सने २९ धावांची खेळी केली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्मसाठी झगडणाऱ्या विराट कोहलीने जिद्दीने खेळ करत ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. सनरायजर्सतर्फे भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ६ बाद १६० (विराट कोहली ६७, एबी डीव्हिलियर्स २९, भुवनेश्वर कुमार २/२७) पराभूत विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद : १९.४ षटकांत ३ बाद १६१ (डेव्हिड वॉर्नर ५९, शिखर धवन ५०, वरुण आरोन २/३६)
सामनावीर : डेव्हिड वॉर्नर</p>