क्रिकेट विश्वचषक संपला. त्याचा हँगओव्हरही आता उतरलाय. पण आता पुन्हा एकदा क्रिकेटची झिंग चढेल ती आयपीएलच्या निमित्ताने. कारण काही दिवसांमध्ये आयपीएलच्या आठव्या हंगामाचा नारळ फुटेल आणि पुन्हा एकदा या चटपटीत क्रिकेटने सारे क्रिकेट जगत व्यापून जाईल. पुन्हा नवीन चेहरे, नवीन नायक k07आणि नवीन रणनीती पाहण्याचा योग येईल आणि एक नवा चॅम्पियन पुन्हा एकदा मिळेल. पण यंदाचे आयपीएल यापूर्वीच्या स्पर्धासारखेच असेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
दरवर्षी आयपीएलच्या निमित्ताने क्रिकेटचा कुंभमेळा भरतो. सर्व देशांचे खेळाडू एका संघासाठी एकत्र येऊन खेळतात. हे पाहायला गंमत वाटते. कारण देशाकडून खेळताना एकमेकांशी त्यांचे दुराव्याचे निर्माण झालेले संबंध इथे सुधारतात. सारं काही विसरून खांद्याला खांदा लावून ते जेव्हा खेळतात ते पाहणे आनंददायी वगैरे असते. विश्वचषकात ज्या खेळाडूंनी कमाल केली त्यांच्यावर या वेळी सर्वात जास्त नजरा असतील.
आयपीएलचा एक गुण आहे. तो म्हणजे दुखापतींनी त्रस्त असलेले खेळाडूही आता पूर्णपणे तंदुरुस्त झालेले पाहायला मिळतील. देशाकडून खेळताना एखाद वेळेस त्यांच्या पोटात कळ येऊन ढोपर दुखत असेलही, पण आयपीएलसाठी मात्र जिवाची पर्वा न करता पैशांची तुंबडी भरण्यासाठी ते कधीही तत्पर असतात. जमाना पैशांचा आहे. क्रिकेटचा आहे की नाही माहिती नाही. लोकांनाही हल्ली भपकेपणाच भावतो. त्यामुळे एखाद वेळेस ते विनामूल्य असलेल्या रणजी किंवा इराणी करंडकाला गर्दी करणार नाहीत. पण आयपीएलसाठी मात्र कितीही हजारांची तिकिटे ते काढतात. कामाच्या व्यापानंतर रीलॅक्स होण्यासाठी त्यांना आयपीएलचा डोस लागतो म्हणे.
बीसीसीआयसाठी आयपीएल म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरलेली आहे. त्यामुळेच आपल्याकडच्या स्थानिक स्पर्धासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. बीसीसीआय दरवर्षी मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा भरवत असते. पण या वेळी या दोन्ही स्पर्धा जवळपास एकाच वेळेला होत असल्यामुळे खेळाडूंनी मुश्ताक अली स्पर्धेला सोयीस्करपणे बगल दिली आहे आणि चूक बीसीसीआयचीच असल्यामुळे तेदेखील मूग गिळून बसले आहेत. आयपीएलसाठी खेळाडूंचा सराव सुरू झाला आहे. पण दुसरीकडे मुश्ताक अली स्पर्धेचे भवितव्य काय? हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. मुश्ताक अली स्पर्धेमध्ये सारे नवखे खेळाडू खेळताना दिसतील. अगदी गेल्या २-३ वर्षे रणजी खेळणारे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे मुश्ताक अली करंडकामध्ये कोण खेळणार? हादेखील मोठा प्रश्न आहे. एकीकडे आयपीएलचा बाजार मांडायचा, पैसे कमवायचे आणि दुसरीकडे स्थानिक स्पर्धेच्या गळ्याला नख लावायचे, हे बीसीसीआय करताना दिसते. जर त्यांना खरेच क्रिकेटचा एवढा सोस आहे किंवा क्रिकेटला मोठे करायचे आहे, तर स्थानिक क्रिकेट स्पर्धाचा गळा कशाला घोटताय? असा प्रश्न दर्दी क्रिकेट रसिक विचारत आहेत. स्थानिक संघटनांचेही काही दुसरे म्हणणे नाही. मुश्ताक अली स्पर्धेमध्ये दुय्यम दर्जाचे खेळाडू उतरवले गेले असल्याने स्पर्धाही त्याच दर्जाची होणार, हे वेगळे सांगायला नक्कीच नको.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग संदर्भातील सर्वोच्च न्यायालयामध्ये  सुनावणी सुरू आहे. काही सट्टेबाज आणि काही मध्यस्थांपर्यंत ही सुनावणी येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर काही संघमालकांनाही चांगलाच दणका बसला आहे. मुदगल समितीच्या अहवालामध्ये काही खेळाडूंचीही नावे आहेत, ती नावे कधी जाहीर होणार याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. जर आयपीएल दरम्यान या खेळाडूंची नावे जाहीर झाली तर आयपीएलवर त्याचा मोठा विपरीत परीणाम होईल. एकदंरीत आपीएलवर या सुनावणीचे सावट नक्कीच असेल. आयपीएलने काही प्रमाणात विश्वासार्हता गमावलेली आहेच. पण तरीही चाहते यामध्ये एवढे बुडालेले आहेत की त्यांना फक्त आपल्या मनोरंजनाचे देणेघेणे आहे, त्यांना दुसऱ्या गोष्टींवर जास्त रस आहे असे वाटत नाही. कारण आयपीएलच्या सहाव्या हंगामात जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हादेखील चाहत्यांनी स्पर्धेला दमदार प्रतिसाद दिला होता.
आयपीएल म्हणजे अनास्थेशियाचा एक प्रकार असल्याचेच समोर येताना दिसत आहे, त्यामध्ये अस्सल क्रिकेट, खेळ भावना, संघ भावना किती आहे, हे महत्वाचे नाहीच. आयपीएल एक जत्रा होऊन बसली आहे, जिथे फक्त मनोरंजन मिळेल, बाकी कशाचेही देणेघेणे नाही आणि लोकांनाही स्वत:च्या व्यविधानातून बाहेर येण्यासाठी हेच हवे आहे. आयपीएल रंगेल, पैसे उधळले जातील, काही जण खोऱ्याने पैसे कमवतीलही, पण अस्सल क्रिकेट मात्र उपेक्षितच राहते आहे, त्याचा विचार करायला मात्र वेळ कुणाकडे आहे. ‘यह इंडिया का त्योहार हैं’ हे आयपीएलच गाण स्पर्धेला साजेसं असंच, कारण हा आता फक्त व्यावसायिक उत्सवच बनून राहीला आहे. त्याचे क्रिकेटशी किती घेणे देणे आहे, हे ज्याचे त्याने समजून घ्यावे.