25 May 2020

News Flash

IPL आणि बदललेलं क्रिकेट

#10YearsChallenge : IPL ने १० वर्षात दिले नव्या उमेदीचे तडफदार खेळाडू आणि Gentleman's Game ला न शोभणाऱ्या काही कटू आठवणी

IPL आणि बदललेलं क्रिकेट

सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातील छोट्यात छोटी गोष्टदेखील जगभरात यशस्वीपणे पोहोचवता येते. सध्या सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असलेली गोष्ट म्हणजे #10YearsChallenge. फेसबुकवर या चॅलेंजला सुरुवात झाली आणि पाहता-पाहता हे चॅलेंज सर्वत्र पसरले. उत्साही बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री यांनी या चॅलेंजला भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर क्रिकेट आणि इतर क्षेत्रातच नव्हे, तर सामान्य नेटकऱ्यांनीही हे चॅलेंजला seriously घेतले आणि सोशल मीडिया चक्क फोटोंनी भरून गेले. या साऱ्यात माणसांचे १० वर्षातील फरक दिसले, पण भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटचे बदललेले रूप दिसले नाही. भारतातील क्रिकेटला बदलण्याचे मोठे काम हे एका हाय-प्रोफाइल स्पर्धेने केले. ती स्पर्धा म्हणजे IPL.

IPL ने भारतातील क्रिकेट तर बदललेच पण त्याबरोबरच अनेक गोष्टी बदलल्या. भारताला एक ग्लॅमरस देश म्हणून जगाच्या पटलावर नाव मिळवून देण्यात IPL चा मोठा हात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणून भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनी पाहू या IPL चा #10YearsChallenge

टीम इंडियाला मिळाले नव्या उमेदीचे तडफदार खेळाडू

IPL चा सगळ्यात मोठा फायदा हा भारतातील तरुण आणि उमद्या खेळाडूंना झाला. २००८ साली IPL चा पहिला हंगाम रंगला आणि त्या हंगामातून अनेक कमी वयाच्या आणि लोकप्रिय नसलेल्या भागातील खेळाडूंना IPL ने प्रकाशित केले. जसजसे IPLचे नवनवे हंगाम आले, तसे अनेक नवनवे खेळाडू भारताच्या कानाकोपऱ्यातून जगभरातील क्रिएकटप्रेमींच्या दृष्टीस पडू लागले. त्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हे पुढे भारतीय संघाचा अविभाज्य घटकही बनले. भारताच्या वेगवान गोलंदाजीचा भार सांभाळणारा जसप्रीत बुमराह, चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव, परदेशी खेळपट्ट्यांवर सातत्याने यशस्वी ठरलेला फिरकीपटू युझवेन्द्र चहल, फलंदाज मनीष पांडे, अष्टपैलू हार्दिक पांड्या ही त्यातील काही निवडक उदाहरणे आहेत.

खेळाडूंच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला

भारतात आधी BCCI ने आयोजित केलेल्या रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी किंवा तत्सम स्पर्धा होत्या. या स्पर्धेत अनेकदा वशिल्याने खेळाडू निवडले जात असल्याची प्रकरणे समोर आली. पण तरीदेखील ही पद्धत पूर्ण बंद होऊ शकली नाही. IPL मध्ये प्रत्येक खेळाडूला त्याच्या खेळीनुसार मानधन मिळू लागले. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या अनेक प्रतिभावान खेळाडूंच्या कुटुंबांना IPL ने अक्षरश: मालामाल केले. रोजंदारी आणि बेठबिगारी करणाऱ्या लोकांच्या मुलांना IPL मध्ये अपेक्षेपेक्षा भरघोस मानधन मिळाले. IPL नंतर खेळाडूंच्या राहणीमानात सुधारणा झाली आणि त्यांनाही ‘ग्लॅमरस’ लूकची भुरळ पडू लागली. याचबरोबर कागदावर प्रतिभावान दिसणाऱ्या पण मैदानात फेल होणाऱ्या खेळाडूंना IPL ने जागा दाखवून दिली. सौरव गांगुली, युवराज सिंग ही याची अगदी ताजी आणि चपखल उदाहरणे आहेत.

ग्लॅमरच्या नावाखाली ‘चीअरलीडर’ संस्कृतीचा प्रवेश

IPL मुळे चीअरलीडर संस्कृती आणि त्यापाठोपाठ अपेक्षित अयोग्य गोष्टींचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव झाला. IPL मध्ये छोट्या कपड्यात मैदानावर नृत्याविष्कार दाखवणाऱ्या चीअरलीडरमुळे अनेकांनी या प्रकाराकडे पाठ फिरवली. अनेकांनी त्यावर टीका केली. याच पद्धतीच्या नंतर Afterparty आणि त्यानंतरच्या इतर Gentleman’s Game ला न शोभणाऱ्या गोष्टीही चर्चेत आल्या. तसेच या प्रकाराचा १० वर्षातील परिणाम म्हणजे हल्ली स्थानिक आणि छोटोखानी लीग स्पर्धांमध्येही ग्लॅमरच्या नावाखाली अशा चीअरलीडर पाहायला मिळतात. हे कितपत योग्य यावर मत-मतांतर असू शकते.

मैदानावरील क्रिकेटमध्ये झाले आमूलाग्र बदल

कसोटी आणि एकदिवसीय सामने माहिती असलेल्या क्रिकेटला टी२० हे नवीन अपत्य झाले आणि क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या पहिल्या दोन अपत्यांचा जवळपास विसर पडला. खेळपट्टीवर उभे राहून शांत आणि संयमी खेळी करणाऱ्या आणि बचावाचा फटका कसा खेळावा हे शिकणाऱ्या खेळाडूंची पिढी जाऊन फटकेबाज खेळाडूंची पिढी मैदानावर आली. द्विशतके, शतके आणि अर्धशतके यांचा जमाना असलेल्या क्रिकेटमध्ये ३०+ धावसंख्येच्या खेळीचेही महत्व वाढले. सुदैवाने गोलंदाजीत 5 wicket haul मात्र अद्याप तसाच आहे.

खेळाडूच्या आक्रमकतेमुळे क्रिकेटला गालबोट

या झंझावाती खेळीच्या संस्कृतीचा परिणाम मैदानातील आक्रमतेत दिसून आला. पराभवानंतर हरभजनने श्रीशांतला लगावलेली चपराक येथून या प्रकाराला सुरुवात झाली. त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात मैदानात झालेला वादही भारतीय क्रिकेटला मारक ठरला. मिचेल स्टार्कने चेंडू टाकण्यासाठी रन-अप घेतला पण पोलार्डने चेंडू खेळण्यास नकार दिला. त्यांनतर स्टार्कने पोलार्डच्या अंगावर मुद्दामून फेकलेला चेंडू आणि प्रत्यत्तरात पोलार्डने स्टार्कवर उगारलेली आणि फेकलेली बॅट या आणि अशा अनेक गोष्टींनी हा खेळाला गालबोट लागले.

या आणि अशा अनेक कारणामुळे गेली १० वर्षे IPL हा भारतासाठी शाप की वरदान हा प्रश्न चर्चिला जात आहे. प्रत्येकाची यावरील उत्तरं नक्कीच वेगळी असणार यात वाद नाही. पण ‘भूतकाळातील वाईट सोडून द्यावे आणि चांगले ते घेऊन पुढे जात राहावे’, या विचाराने प्रत्येक वर्षी भारतीय क्रिकेटप्रेमी IPL चे स्वागत करत असतो आणि यापुढेही करत राहील हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 8:38 pm

Web Title: ipl and change in cricket in last 10 years
Next Stories
1 IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी राहुलचा संघात समावेश?
2 Flashback : अरेरे… जाणून घ्या २६ जानेवारी अन् ‘टीम इंडिया’चा लाजिरवाणा इतिहास
3 धोनीपासून पृथ्वीपर्यंतचा टीम इंडियाचा दशकभराचा प्रवास
Just Now!
X