भारतीय संघातून डच्चू मिळालेल्या युवराज सिंगने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात सर्वाधिक बोलीचा मान मिळवला. गॅरी कर्स्टनच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल १६ कोटी रुपये खर्चून युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
गेल्या हंगामात गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने संघाच्या पुनर्बाधणीचा निर्णय घेतला. किंग्ज इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यानंतरचा युवराजचा हा चौथा संघ असणार आहे. गेल्या हंगामात विक्रमी बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने युवराजला संघात समाविष्ट केले होते. मात्र प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्यांनी युवराजला वगळण्याचा निर्णय घेतला.
अन्य खेळाडूंमध्ये दिल्लीने डच्चू दिलेल्या दिनेश कार्तिकसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १०.५० कोटी रुपये मोजले. जबरदस्त फॉर्मात असलेला श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ७.५ कोटी रुपये खर्चून विकत घेतले. भारताचा अनुभवी गोलंदाज झहीर खानला लिलावाच्या पहिल्या टप्प्यात कोणीही खरेदी केले नाही. मात्र दुसऱ्या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४ कोटी रक्कम देत झहीरला विकत घेतले. धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसनला सनरायजर्स हैदराबादने २ कोटी रुपये देत खरेदी केले.
रिचर्ड मेडले या प्रसिद्ध लिलावतज्ज्ञांनी नेहमीप्रमाणेच या हंगामाच्या लिलावाचेही सूत्रसंचालन केले. लिलावात एकूण ७८ भारतीय, तर ४४ विदेशी असे एकूण ३४४ खेळाडू उपलब्ध होते. प्रत्येक फ्रँचाइजी संघात कमाल नऊ विदेशी खेळाडू घेऊ शकण्याची अट होती. संघाची कमाल मर्यादा २७ होती. लिलावात २३ विदेशी खेळाडूंसह ६७ खेळाडूंना फ्रँचाइजींनी विकत घेतले.
स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सातत्याने धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला दिल्ली डेअरडेव्हिल्सने २.६ कोटी रुपये किमतीत विकत घेतले. एकही प्रथम श्रेणीचा सामना न खेळलेल्या किशन करिअप्पाला २.४ कोटी एवढय़ा प्रचंड बोलीसह कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतले. शॉन अ‍ॅबॉटला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १ कोटी रुपये देत विकत घेतले. भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियाच्या गुरिंदर संधूलाही दिल्लीने खरेदी केले. मुंबईकर युवा सर्फराझ खानला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५० लाख रुपये देत तर सिद्धेश लाडला मुंबई इंडियन्सने १० लाख रुपये देत खरेदी केले.
हशिम अमला, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, चेतेश्वर पुजारा यांच्यासह २७७ खेळाडूंना लिलावात कोणत्याही फ्रँचाइजींनी विकत घेतले नाही.

* सीएम गौतम ( २० लाख)- दिल्ली डेअरडेविल्स
* सरफराज खान आयपीएलमधील सर्वात तरूण खेळाडू ( ५० लाख)- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
* श्रेयस अय्यर ( २.६ कोटी)- दिल्ली डेअरडेविल्स
* दिनेश कार्तिक( १०.५ कोटी)- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
* हैद्राबाद सनरायजर्स संघाकडून विल्यम्सन ६० लाख आणि केविन पीटरसनसाठी २ कोटींची बोली
* श्रीलंकेचा महेला जयवर्धने अनसोल्ड

* युवराज सिंग १६ कोटी- दिल्ली डेअरडेव्हिल्स
* न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट ३.८० कोटी- हैद्राबाद सनरायझर्स
* मुनाफ पटेल आणि झहीर खान अनसोल्ड
* श्रीलंकेचा दिलशान देखील अनसोल्ड
* ऑस्ट्रेलियाचा सीन अॅबॉट १ कोटींसह बंगळुरूसंघात
* भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकट १.१ कोटी- दिल्ली डेअरडेव्हिल्स
* प्रवीण कुमार २.२० कोटी- सनरायझर्स हैदराबाद
* अमित मिश्रा ३.३० कोटी- मुंबई इंडियन्स
* प्रग्यान ओझा ५० लाख- मुंबई इंडियन्स
* फिरकीपटू राहुल शर्मा ३० लाख- चेन्नई सुपरकिंग्ज
* ब्रॅड हॉग ५० लाख- कोलकाता नाईट रायडर्स