News Flash

IPL 2018: सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा मंजूर अहमद पंजाबकडून खेळणार

त्याचे वडील मजुरी करतात

Manzoor ahmed dar: एका मजुराचा मुलगा असलेल्या मंजूर अहमदने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती.

गेल्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी आयपीएलच्या ११व्या सत्रासाठी खेळाडुंची लिलाव प्रक्रिया पार पडली. अनपेक्षितपणे भारताच्या जयदेव उनाडकटला तब्बल साडेअकरा कोटींची बोली लावण्यात आली तर टी २० चा बादशाह स्फोटक फलंदाज ख्रिस गेल व युवराज सिंग यांना फक्त २ कोटींचा भाव मिळाला. यंदाच्या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक छोट्या छोट्या संघातील व भागातील खेळाडुंना यावेळी संधी मिळाली. यात अफगाणिस्तान, नेपाळच्या खेळाडुंबरोबर भारतातीलही काही दुर्लक्षित राहिलेल्या भागातील खेळाडुंना संघांनी विकत घेतले. त्यातीलच एक नाव मंजूर अहमद दार. अनेक प्रतिस्पर्धी खेळाडुंना मागे टाकत प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यासाठी २० लाख रूपयांची बोली लावली. काश्मीरमधील एका छोट्या गावातून किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचण्यासाठी मंजूर अहमद दारने मोठी मेहनत घेतली.

श्रीनगरमधील एका ऑटोमोबाइल शोरूममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेल्या मंजूर अहमदसाठी हा मोठा आनंदाचा क्षण आहे. त्याला स्वत:ची प्रतिभा दाखवण्याची एका चांगली संधी मिळाली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’बरोबर बोलताना २४ वर्षीय मंजूर अहमद म्हणाला की, माझ्या आयुष्यातील हा सर्वांत महत्वाचा दिवस आहे. माझा आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे.

सुगानपोरा गनास्तान गावात राहणाऱ्या मंजूर अहमदचा क्रिकेटमधील प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. तो गरिबी आणि पक्षपातीपणाशी संघर्ष करत इथेपर्यंत पोहोचला आहे. राज्याच्या क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी मला किती संघर्ष करावा लागला होता, हे फक्त मलाच माहीत आहे. मी आतापर्यंत खूप कष्ट घेतलेत. त्याचेच आज फळ मिळाले आहे. माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही तर आयपीएलमध्ये माझा समावेश करण्यात आला, हेच मला महत्वपूर्ण आहे, असे तो म्हणाला.

यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेला मंजूर अहमद काश्मीरचा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या सुदृढ प्रकृतीमुळे तो पांडव नावाने ओळखला जातो. त्याने मागील वर्षी विजय हजारे चषकात जम्मू आणि काश्मीरकडून आपला पहिला सामना खेळला होता. एका मजुराचा मुलगा असलेल्या मंजूर अहमदने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. परंतु, एका स्थानिक सामन्यात त्याने लगावलेल्या उंचच उंच षटकारांमुळे तो प्रकाशझोतात आला होता. त्या सामन्यापासून त्याची ओळख काश्मीरचा ‘सिक्सर मॅन’ म्हणूनच झाली. नोकरी करण्यासाठी मंजूरला आपले गाव सोडावे लागले होते.

त्याला शालेय शिक्षणही अर्ध्यावरच सोडून द्यावे लागले होते. घरात तो मोठा असल्याने व हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला सुरक्षा रक्षक म्हणून काम करावे लागत होते. तो ज्या शोरूममध्ये काम करत होता. तेथून शेर ए काश्मीर क्रिकेट स्टेडिअम दहा किमी लांब होते. एकवेळ अशी होती की, त्याच्याकडे स्टेडिअमपर्यंत जाण्यासाठी पैसेही नसायचे. तो चालतच जात असत. मंजूर अहमदचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे काश्मीरमधील इतर खेळाडुंनाही प्रोत्साहन मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2018 12:35 pm

Web Title: ipl auction 2018 kashmir player manzoor ahmed dar kings xi punjab
Next Stories
1 IPL 2018: आयपीएल लिलावात महिला क्रिकेटपटू का नाही: ऋषी कपूर
2 IPL 2018: संदीप लामिचेन आयपीएलमध्ये खेळणारा पहिला नेपाळी क्रिकेटपटू
3 IPL 2018: अफगाणिस्तानच्या १७ वर्षीय मुजीबला मिळाले तब्बल ४ कोटी
Just Now!
X