आयपीएलच्या २०१९ मधील सत्रासाठी जयपूरमध्ये सध्या खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावामध्ये भारतीय आणि विदेशी खेळाडूंवर कोट्यवधी रूपयांची बोली लावली जात आहे. या लिलावात इंग्लंडचा २० वर्षीय अष्टपैली सॅम करनवर कोट्यवधी रूपयांची बोली लावली आहे.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात विराटसेनेची डोकेदुखी ठरलेल्या सॅम करनला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सात कोटी २० लाख रूपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे. सॅम करनची बेस प्राईज दोन कोटी रूपये होती. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई, राजस्थान, बंगळुरू आणि पंजाबमध्ये बोली लागली. मात्र, पंजाबने सात कोटी २० लाख रूपयांची किंमत मोजत त्याला आपल्या संघात घेतलं आहे.

( आणखी वाचा : Mystery Boy वरूण चक्रवर्ती ठरला ८ कोटींचा मानकरी )

सॅम करन २०१९मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. सॅमने आतापर्यंतच्या ४७ टी२० सामन्यात ४२ बळी आणि ४७८ धावा केल्या आहेत. सॅमच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये कोट्यवधी रूपयांची बोली लागली आहे. तो आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे.

( आणखी वाचा :  या खेळाडूंनी घेतली यंदा कोटीची उड्डाणे )

सॅम करनला भारताविरोधात कसोटी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या मालिकेत सॅमने सात डावांत फलंदाजी करताना २७२ धावा आणि गोलंदाजीवेळी ११ बळी घेतले होते. इंग्लंडच्या मालिकाविजयात सॅमचा सिंहाचा वाटा होता. नुकत्याच श्रीलंका दौऱ्यातही सॅमने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

(आणखी वाचा : मुंबईकर शिवम दुबे RCB मध्ये! ‘रणजी’तील अष्टपैलू खेळी आली कामी)

दरम्यान, गतवर्षी सर्वात महागडा खेळाडू म्हणून चर्चेत आलेल्या जयदेव उनाडकटला यंदाही राजस्थान रॉयल्सने ८ कोटी ४० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात कायम राखलं आहे. याचसोबत मोहम्मद शमीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ कोटी ८० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. लसिथ मलिंगाने यंदाच्या हंगामात खेळाडूच्या रुपात मुंबईच्या संघाकडून पुनरागमन केलं आहे. वरुण अॅरोनला राजस्थान रॉयल्सने २ कोटी ४० लाख तर मोहीत शर्माला चेन्नईने ५ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे.