भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने अगदी शेवटच्या मिनिटाला एक कोटींची बोली लावून विकत घेतले. पहिल्या फेरीत कोणीच बोली न लावलेल्या युवराजला मुंबईने दुसऱ्या फेरीत आपल्या संघात स्थान दिले. युवराज मुंबई संघात असल्याने नेटकऱ्यांनी आता युवराज आणि रोहितची फटकेबाजी एकत्र पहायला मिळेल म्हणून आनंद व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी यांनेही युवराजची खरेदी ही आमच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात महत्वाची खरेदी असल्याचे म्हटले आहे. तसंच युवराजला विकत घेण्यामागील कारणही आकाशने सांगितले आहे.

युवराजला संघात घेण्याबद्दल आकाश म्हणतो, ‘खरं सांगायचं तर युवराज आणि मलिंगासाठी याहून अधिक पैसे खरेदी करण्याची तयार ठेवली होती. युवराजसारखा धडाकेबाज फलंदाज एक कोटी रुपयांना मिळणे म्हणजे मागील १२ वर्षातील आमची सर्वात महत्वाची खरेदी आहे. युवराजने आत्तापर्यंत देशाला सर्वच चषक मिळवून दिले आहेत.’ पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने विकत न घेतलेल्या युवराजला दुसऱ्या फेरीत अचानक विकत घेतल्याबद्दलही आकाशने मुंबई इंडियन्सची भूमिका स्पष्ट केली. आम्ही अनुभवी खेळाडू आणि तरुण खेळाडूंचा योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहोत. युवराज आणि मलिंगासाठी आम्ही काही विशेष योजना तयार केल्या असून त्यांचा योग्य वापर करुन घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आकाश म्हणाला.

एक कोटींच्या बेस प्राइजवर युवराजला पहिल्या फेरीमध्ये कोणीही विकत घेतले नाही. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये युवराजचा पुन्हा लिलाव करण्यात आला तेव्हा मुंबईने त्याला एक कोटींच्या बेस प्राइजला विकत घेतले. याशिवाय मुंबईने संघासाठी मागील वर्षी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या श्रीलंकन जलद गोलंदाज असणाऱ्या लसिथ मलिंगालाही विकत घेतले. दोन कोटींच्या बेस प्राइजला मलिंगाला मुंबईने पुन्हा संघात स्थान दिले आहे.

२०१५ च्या पर्वामध्ये युवराजला दिल्लीने १६ कोटींची किंमत देऊन विकत घेतले होते. त्यावेळी त्याची कामगिरी चांगली झाली नाही. त्यानंतर प्रत्येक लिलावामध्ये युवराजच्या किंमत कमीकमीच होत गेली आहे. २०१६ च्या पर्वात सनरायझर्स हैद्राबादने ७ कोटींना युवराजला विकत घेतले होते. त्यानंतर मागील वर्षी पंजाबने त्याला दोन कोटींना विकत घेतले होते. मात्र २०१९ च्या पर्वासाठी पंजाबने युवराजला रिटेन न करता करारमुक्त केले. युवराजला भारतीय संघातही स्थान मिळत नसल्याने त्याने आपली बेस प्राइज एक कोटी ठेवण्याचा निर्णय घेतला. आता मुंबईच्या संघामधून युवराज कसा खेळतो याबद्दल मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.