इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता असून, ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

‘आयपीएल’चा आगामी हंगाम भारतात होणार की परदेशात हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र हंगाम होण्याबाबत आशावादी आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०चा ‘आयपीएल’ हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत झाला होता. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांद्वारे देशात ‘आयपीएल’ होण्याबाबतची स्पष्टता येऊ शकेल. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत संघांसाठी खेळाडू स्थलांतरण व्यवहार प्रक्रिया सुरू राहील.