‘आयपीएल’मध्ये समाविष्ट करण्यात येणाऱया दोन नवीन संघांची मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर घोषणा करण्यात आली. ‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ मैदानात उतरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या अहवालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे दोन वर्षांसाठी निलंबन केले आहे. त्यांच्या जागी दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्यानंतर आज या नव्या संघांची घोषणा करण्यात आली. चेन्नई आणि राजस्थानऐवजी आता पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.
पुण्याच्या संघाची मालकी कोलकाताचे उद्योजक संजीव गोएंका यांनी घेतली असून, राजकोट संघाची मालकी इंटेक्स मोबाईल कंपनीकडे असणार आहे. संजीव गोएंका हे कोलकातामधील आरपीजी समूहाचे प्रमुख आहेत. यापूर्वी गांगुलीच्या सल्ल्यानुसार गोएंका यांनी आयएसएलमधील कोलकता डी अ‍ॅटलेटीको सहमालक पद स्वीकारले आहे.