आयपीएल पेचप्रसंगाबाबत राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय समितीने दिलेला अहवाल आणि शिफारशींवर चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीची बैठक २८ ऑगस्टला कोलकाता येथे होणार आहे.कोलकाता येथे होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीची सूचना मिळाली असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले. शुक्ला, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यासह मंडळाचे कायदेशीर सल्लागार यू. एन. बॅनर्जी यांना न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या अहवालाचा अभ्यास करून आगामी आयपीएलच्या दृष्टीकोनातून शिफारसी आणि सूचना करण्यासाठी सहा आठवडय़ांचा कालावधी दिला होता.गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत लोढा समितीच्या अहवालावर चर्चा झाली आणि याचा आढावा घेण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समतीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला दोन वर्षांसाठी आयपीएलमधून निलंबित केले आहे.