चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेश निश्चित झाला आहे. मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सकडून पत्करलेला पराभव हा धक्कादायक होता, परंतु त्यामुळे ‘प्ले-ऑफ’ चेन्नईच्या समीकरणाला कोणताही हादरा बसलेला नाही. आयपीएलच्या सातव्या मोसमात अनिश्चिततेसाठी खास ओळखल्या जाणाऱ्या सनरायजर्स हैदराबादशी चेन्नईचा गुरुवारी सामना होणार आहे, परंतु चेन्नईकरिता हा सामना फक्त एक औपचारिकता असेल.
चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत १२ सामन्यांत आठ विजयांसह १६ गुणांची कमाई केली आहे, तर प्रतिस्पर्धी हैदराबादच्या खात्यावर १२ सामन्यांत पाच विजयांसह १० गुण जमा आहेत. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नई दुसऱ्या स्थानावर, तर हैदराबादचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे चेन्नईचे पारडे हैदराबादपेक्षा जड असेल.
मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात चेन्नईचा कोलकाताविरुद्धचा पराभव हा अनपेक्षित असाच होता; परंतु प्ले-ऑफकडे वाटचाल करताना चेन्नईला आपल्या फलंदाजीत व गोलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
सलामीवीर ड्वेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅक्क्युलम या दोघांनी चेन्नई सुपर किंग्जच्या आतापर्यंतच्या प्रवासात सिंहाचा वाटा उचलला आहे. स्मिथ कोलकाताविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला, तर मॅक्क्युलमला मोठी धावसंख्या काढण्यात अपयश आले. सुरेश रैनाने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करीत आयपीएलच्या मोसमातील तिसरे अर्धशतक साजरे केले. फॅफ डय़ू प्लेसिसकडूनही चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका अद्याप बजावता आलेली नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या हंगामात एकही अर्धशतक साजरे केले नसले तरी त्याच्या बॅटमधून धावांचा प्रवाह निरंतर वाहतो आहे. धोनीने १२ सामन्यांमध्ये ४४.६०च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत, यापैकी सात वेळा तो नाबाद राहिला आहे.

संघ    सा.    वि.    प.    गु.
पंजाब    १२    ९    ३    १८
चेन्नई    १२    ८    ४    १६
राजस्थान    १२    ७    ५    १४
कोलकाता    १२    ७    ५    १४
मुंबई    १२    ५    ७    १०
बंगळुरू    १२    ५    ७    १०
हैदराबाद    १२    ५    ७    १०
दिल्ली    १२    २    १०    ४