प्रशांत केणी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगचा १४ वा हंगाम अध्र्यावरती स्थगित करण्याची नामुष्की भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) ओढवली. देशात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना ‘आयपीएल’चे मनोरंजन कशाला, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या मंडळींच्या विरोधामुळे स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण जैव-सुरक्षित परीघ भेदून चार संघांना करोनाची लागण झाल्यामुळे तूर्तास ‘आयपीएल’ स्थगित करण्याशिवाय पर्यायच नव्हता, ही वस्तुस्थिती सर्वप्रथम स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

गतवर्षी करोनाच्या साथीमुळे मदानांवरील सामने स्थगित झाले असताना जैव-सुरक्षित परिघाचे सूत्र वापरल्याने क्रीडाक्षेत्राला संजीवनी मिळाली. जर्मनीत बंडेसलीगा यशस्वीपणे मदानावर परतल्यानंतर फुटबॉलमधील जवळपास सर्वच स्पर्धा सुरू झाल्या. काही महिन्यांतच हे लोण क्रिकेटमध्ये पसरले. वेस्ट इंडिजचा इंग्लंड दौरा हे जैव-सुरक्षित परिघामधील पहिले आव्हान यशस्वीपणे पेलल्यानंतर अन्य देशांमध्येही दबक्या पावलांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले. इतकेच नव्हे, तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये ५३ दिवसांत ६० सामन्यांचा ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाचा थरार सफल संपूर्ण पार पडला. त्यानंतर ‘आयपीएल’चे १४ वे पर्व भारतात खेळवण्याचा अट्टहास धोक्याचा ठरला. ‘आयपीएल’चा आणखी एक हंगाम अमिरातीत खेळवता येऊ शकला असता, असे काही जणांचे म्हणणे आहे. परंतु भारतात मुश्ताक अली ट्वेन्टी-२० आणि विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे झाल्या. नंतर इंग्लंडने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचा प्रदीर्घ भारत दौराही पूर्ण केला. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला ‘आयपीएल’ होऊ शकेल, हा विश्वास वाटणे स्वाभाविक होते. करोनाच्या काळात ताणतणाव वाढले असताना दररोज सायंकाळचे काही तासांचे क्रिकेट मनोरंजन नागरिकांना दिलासादायी वाटत होते. स्पध्रेला स्वल्पविराम मिळण्यापूर्वी २४ दिवस २९ सामन्यांचा थरार क्रिकेटचाहत्यांनी अनुभवला. गतवर्षी ‘बीसीसीआय’ने करोनाच्या पाश्र्वभूमीवर ५१ कोटी रुपयांची मदत केली होती. परंतु आर्थिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या या संघटनेने आणखी पसे द्यावेत, या हेतूने काही जणांनी ‘आयपीएल’ थांबवावे, अशी मागणी सुरू केली. कारण ‘आयपीएल’ ही स्पर्धा म्हणजे आदर्श महसूल प्रतिकृती आहे, हे मात्र त्यांना मान्य आहे.

करोना रुग्णसंख्या वेगाने वाढल्यामुळे अनेक देशांनी भारतासाठी हवाई र्निबध कडक केले, तर ‘आयपीएल’मध्ये समावेश असलेल्या काही खेळाडू-सामनाधिकाऱ्यांच्या नातलगांना करोनाची लागण झाली. त्यामुळे जैव-सुरक्षित परिघातही अस्वस्थतेचे वातावरण पसरले. काही खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांनी माघार घेतली. पण चार संघांमधील खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आणि ‘आयपीएल’ स्थगित करावे लागले. सहा ठिकाणी स्पध्रेच्या आयोजनामुळे हवाई प्रवास करावा लागला, म्हणून जैव-सुरक्षित परीघ भेदले गेल्याचे आता स्पष्ट होत आहे. हीच स्पर्धा अनेक मदानांची उपलब्धता असलेल्या मुंबई या एकाच शहरात आयोजित केली असती, तर सुरक्षितपणे  होऊ शकली असती. काही महिन्यांपूर्वी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलसुद्धा गोव्यात म्हणजे एकाच शहरात उत्तमपणे पार पडली. चार महिन्यांत ११ संघांमध्ये ११५ सामने झाले.

ब्रिटनमधील ‘रेस्ट्राटा’ या व्यावसायिक कंपनीने अमिरातीत जैव-सुरक्षित परिघाची जबाबदारी घेतली होती. यंदा देशांतर्गत कंपनीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे दोन हजार कोटी रुपयांच्या तोटय़ाचा ताळेबंद मांडताना हासुद्धा मुद्दा चर्चेत आला आहे. ‘आयपीएल’च्या स्थगितीनंतर आता उर्वरित हंगाम कुठे आणि कधी खेळवावा, हा प्रश्न जसा ऐरणीवर आहे. तसाच ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे भारतामधील भवितव्य अधांतरी दिसत आहे. त्यामुळे हे दोन प्रश्न सोडवण्याचे आव्हान ‘बीसीसीआय’पुढे असेल.

prashant.keni@expressindia.com

भारतामध्ये ‘आयपीएल’ खेळवणे, ही संयोजकांची पहिली चूक आहे. अमिरातीत मागील वर्षीप्रमाणेच ही स्पर्धा सुरळीतपणे पार पडली असती. बऱ्याच शहरांत स्पर्धा खेळवण्याऐवजी एकाच शहरांत किं वा दोन गटांत संघविभागणी करून दोन शहरांत स्पर्धा खेळवणे आवश्यक होते. पण अनेक संघटनांना खूश करण्याचा संयोजकांचा प्रयत्न हानीकारक ठरला. करोनाच्या कठीण काळात ऑक्सिजन, व्हँटिलेटर, बेड्स आणि लसीकरण या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे देशात नागरिकांचा उद्रेक झाला आहे. पण त्याला क्रि के ट जबाबदार मुळीच नाही. प्रेक्षकांविना जैव-सुरक्षित परिघात हे सामने सुरू होते. आपण जसे तीन तासांचा चित्रपट पाहतो, तसेच लोक ‘आयपीएल’ क्रि के ट सामन्यांचा आनंद लुटत होते.

-दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार