इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या आठवडय़ात खेळू शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण साऊदम्पटन आणि मँचेस्टर येथे उभय संघांमध्ये सहा मर्यादित षटकांचे सामने ४ ते १६ सप्टेंबपर्यंत चालणार आहेत.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात ४, ६ आणि ८ सप्टेंबर या दिवशी तीन ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत, तर ११, १३ आणि १६ सप्टेंबर या तारखांना तीन एकदिवसीय सामने रंगणार आहेत. त्यामुळे क्रिकेटपटू संयुक्त अरब अमिरातीला १७ किंवा १८ सप्टेंबरला पोहाचू शकतील. ‘आयपीएल’च्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार सहा दिवस या खेळाडूंना विलगीकरणात थांबावे लागेल. या दरम्यान पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी त्यांची करोना चाचणी होईल. या तिन्ही चाचण्यांचे निकाल नकारात्मक आले, तरच सातव्या दिवशी खेळाडूला जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश मिळेल. त्यामुळे किमान २६ सप्टेंबपर्यंत हे क्रिकेपटू पहिले दोन-तीन सामने मुकण्याची दाट शक्यता आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण २९ क्रिकेटपटू ‘आयपीएल’मध्ये खेळत आहेत. यात यंदाच्या लिलावात सर्वाधिक किंमत लाभलेल्या पॅट कमिन्स याच्यासह डेव्हिड वॉर्नर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, स्टीव्ह स्मिथ यांचाही समावेश आहे. जोस बटलर, स्मिथ आणि आर्चर यांच्या अनुपलब्धतेचा राजस्थान रॉयल्सला फटका बसू शकेल.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ तसेच ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, प्रेक्षकांविना होणाऱ्या या जैव-सुरक्षित वातावरणातील मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ २४ ऑगस्टला इंग्लंडमध्ये दाखल होईल. मग ऑस्ट्रेलियाचा संघ डर्बिशायरच्या इन्कोरा कौंटी ग्राऊंड येथे थांबेल. इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील तिसरी कसोटी संपल्यावरच ऑस्ट्रेलियाचा संघ एजेस बाऊलला जाईल. मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा संघ अंतर्गत संघविभागणी करून ५० षटकांचे आणि २० षटकांचे काही सराव सामने खेळेल.

मॅक्डोनल्ड इंग्लंड दौऱ्याला मुकणार

सिडनी : ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ साहाय्यक प्रशिक्षक अ‍ॅन्ड्रय़ू मॅक्डोनल्ड पुढील महिन्यातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहेत. राजस्थान रॉयल्सशी असलेल्या पूर्वकरारामुळे ते ‘आयपीएल’साठी अमिरातीला जाणार आहेत. गेल्या वर्षी पॅडी अप्टन यांच्या जागी मॅक्डोनल्ड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमूणक करण्यात आली होती.