अमोघ वक्तृत्त्वशैली, प्रचंड शब्दभांडार आणि सहजसोप्या भाषेत मैदानावरल्या घडामोडींचे ओघवत्या समालोचनासाठी प्रसिद्ध असलेल्या हर्षां भोगले यांना आयपीएलच्या नवव्या हंगामासाठीच्या समालोचन चमूतून डच्चू देण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे हर्षां आयपीएल सामन्यांसाठीच्या समालोचन ताफ्याचा अविभाज्य घटक होते. मात्र यंदा त्यांना स्पर्धेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र हर्षां यांना डच्चू देण्यात बीसीसीआयचा हात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘हर्षां यांना समालोचन चमूत समाविष्ट करायचे की नाही याचा निर्णय बीसीसीआयच्या अखत्यारित नाही. या सामन्यांचे प्रक्षेपण अधिकार असलेल्या आयएमजी कंपनीचा हा निर्णय आहे. समाजमाध्यमे आणि खेळाडू यांच्याकडून आलेल्या प्रतिसादानुसार हा निर्णय घेण्यात येतो,’ असे सूत्रांनी सांगितले.

हर्षां यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, ‘यासंदर्भात मला कोणीही काही सांगितलेले नाही. समालोचन चमूचा भाग नसल्याचे औपचारिक कारण मला कळवण्यात आलेले नाही. मात्र, हा बीसीसीआय व्यवस्थापनाचा निर्णय आहे, एवढेच मला सांगण्यात आले आहे.’

नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सामन्याच्या समालोचनासंदर्भात ट्विट केले होते. ‘‘सर्व समालोचकांप्रति पुरेसा आदर आहे. मात्र सामन्यादरम्यान भारतीय समालोचक परदेशी खेळाडूंपेक्षा आपल्या खेळाडूंबाबत अधिक बोलले असते तर उचित वाटले असते,’’ अशा शब्दांत अमिताभ यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. या ट्विटला भारतीय संघातील खेळाडूंनी पाठिंबा देत अमिताभ यांच्या भावनांना दुजोरा दिला होता. हे ट्विट सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर यांना उद्देशून नसल्याचे अमिताभ यांनी थोडय़ाच दिवसात स्पष्ट केले होते.

अमिताभ यांच्या भूमिकेसंदर्भात हर्षां भोगले यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपला दृष्टिकोन मांडला. समालोचक या नात्याने मैदानावर घडणाऱ्या घडामोडींचे सर्वसमावेशक चित्र मांडणे आवश्यक आहे, असे मत भोगले यांनी व्यक्त केले होते. दरम्यान आयपीएलच्या नवव्या हंगामाच्या पहिल्या लढतीदरम्यान हर्षां यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आयपीएलचा भाग व्हायला आवडले असते. त्यादृष्टीने तयारीही सुरू होती. आयपीएलचा नववा हंगामही धमाकेदार असेल अशी आशा आहे,’असे हर्षां यांनी म्हटले होते.