20 November 2019

News Flash

… म्हणून स्टेडियममध्ये असूनही नीता अंबानींनी पाहिला नाही मुंबईचा विजय

मुंबईने रोमहर्षक सामन्यात चेन्नईवर एका धावेने मात करत आयपीएल विजयाचा चौकार मारला.

रविवारी मुंबई इंडियन्सने अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करत आयपीएल विजयाचा चौकार मारला. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी मुंबईच्या प्रत्येक सामन्यावेळी संघमालकीन नीता अंबानी स्टेडियममध्ये उपस्थित असतात. मुंबई संघाचा प्रत्येक जय-पराजय त्या पाहताना आपल्याला दिसतात. संघ अडचणीत असताना नीता अंबानी हात जोडून मंत्रजाप करताना अनेकवेळा आपण पाहिलं असेल. मात्र, यंदा स्टेडियममध्ये उपस्थित असनाही नीता अंबानी यांना मुंबईचा विजय पाहता आला नाही. त्यामागील कारणाचा खुलासा सामन्यानंतर खुद्द नीता अंबानी यांनी केला आहे.

सामन्यानंतर बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, ‘सामना अखेरच्या चेंडूपर्यंत पोहचला होता. अखेरच्या षटकांत प्रत्येक चेंडूगणिक सामना दोन्ही संघाकडे झुकत होता. सामना ऐवढा हायप्रेशर आणि रोमांचक होता की अखेरच्या चेंडूवेळी मी डोळे बंद केले. त्यामुळे मुंबईचा विजयी क्षण मी पाहू शकले नाही. स्टेडियममध्ये मुंबई! मुंबई! असा जल्लोष सुरू झाल्यानंतर मला जिंकल्याचे समजले.’

विजयानंतर नीना अंबानी यांनी संघातील प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन केले. रोहित शर्माच्या यशस्वी नेत्वृताबद्दल बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, रोहित शर्मानं शानदार आणि योग्य पद्धतीने संघाचे नेत्वृत्व केलं.

सोशल मीडियावर नीता अंबानी ट्रोल –
अखेरच्या चेंडूवर चेन्नईला दोन धावांची गरज होती. त्यावेळी नीता अंबानी तणावग्रस्त दिसत होत्या. अखेरच्या षटकावेळी त्या हात जोडून मंत्रजाप करत होत्या. त्यांचा हा व्हिडिओ सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. विश्वचषकासाठीसुद्धा तुम्ही भारतीय क्रिकेट संघासोबत राहा, असा सल्लाच एका युजरने त्यांना दिला. तर अनेकांनी तुम्ही नक्की कोणता मंत्रजप करत आहात असा प्रश्न विचारला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

First Published on May 13, 2019 3:33 pm

Web Title: ipl final 2019 mi vs csk didnt watch the last ball says mumbai indians owner nita ambani
टॅग IPL 2019
Just Now!
X