आयपीएलच्या सातव्या पर्वातील अंतिम लढतीचे यजमानपद मिळवण्यासाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) आयपीएल प्रशासकीय समितीच्या अटींचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक शाहरूख खानला १ जूनला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर प्रवेशास परवानगी देणे, हा आणखी एक पेच एमसीएसमोर आहे.
मुंबईच्या वानखेडेवर आयपीएलचा अंतिम सामना व्हावा, याकरिता एमसीएने खालील अटींची पूर्तता करावी. अशा आशयाचे पत्र आयपीएलचे प्रमुख रणजिब बिस्वाल यांनी एमसीएला मंगळवारी सायंकाळी पाठवले होते. या पत्रामध्ये अंतिम सामन्याकरिता सर्व संघांचे मालक आणि अधिकारी यांना वानखेडेवर प्रवेशास परवानगी असावी, असे नमूद करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी शाहरूखने सामना संपल्यानंतर मैदानावर सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. त्यानंतर तत्कालिन अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एमसीएने शाहरूखवर एमसीएच्या परिसरात प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली होती.
श्रीनिवासन यांची आयपीएलबाबत गुप्त बैठक- वर्मा
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कोणत्याही कारभारात हस्तक्षेप करता येणार नाही. परंतु या परिस्थितीतही आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीला श्रीनिवासन यांनी गुप्तपणे हजेरी लावली असावी. बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन अनधिकृत बिहार क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख आदित्य वर्मा यांनी केले आहे.
संघ    सा.    वि.    प.    गु.
पंजाब    १०    ८    २    १६
चेन्नई    १०    ८    २    १६
राजस्थान    १०    ६    ४    १२
कोलकाता    १०    ५    ५    १०
हैदराबाद    १०    ४    ६    ८
मुंबई    १०    ३    ७    ६
बंगळुरू    ९    ३    ६    ६
दिल्ली    ९    २    ७    ४