न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांची आयपीएलमधील महत्वाचा संघ मानला जाणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंबाजच्या प्रशिक्षकपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. हेसन यांच्याशी संघ प्रशासनाने दोन वर्षांचा करार केला असून, हेसन ब्रॅड हॉज यांची जागा घेतील. २०१९ विश्वचषकासाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना हेसन यांनी व्यस्त वेळापत्रकाचं कारण देत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश मेनन यांनी हेसन यांच्या नियुक्तीला दुजोरा दिला आहे. हेसन यांच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंडच्या संघाने २०१५ साली झालेल्या टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशासनाने हेसन यांना आपली पसंती दर्शवली आहे. पंजाबचा संघ आतापर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद पटकावू शकला नाहीये, त्यामुळे आगामी हंगामात हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.