|| प्रशांत केणी
‘चौथी कसोटी खेळण्यासाठी ११ तंदुरुस्त खेळाडूंची आवश्यकता आहे’ अशा आशयाची जाहिरातही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला देता येत नव्हती. कारण करोना साथीमुळे कोणत्याही दौऱ्यावर १४ दिवसांचा अनिवार्य विलगीकरणाचा ‘आयसीसी’चा नियम अडथळा ठरत होता. त्यामुळे करोना चाचणी नकारात्मक आलेला तंदुरुस्त खेळाडू भारतातून पाठवणेही अशक्य होते. अन्यथा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होता. ऑस्टे्रलिया दौऱ्यावरील भारतीय पथकाला छोटेखानी इस्पितळाचेच स्वरूप प्राप्त झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
एकूण दौऱ्यावर असंख्य खेळाडूंना दुखापती झाल्या. अगदी कसोटी मालिकेचा जरी आढावा घेतला तरी अॅडलेडच्या पहिल्या कसोटीपासून ते ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीपर्यंत फक्त कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोनच खेळाडू कायम आहेत. बाकी खराब कामगिरीमुळे संघाबाहेर असलेला पृथ्वी शॉ वगळता दुखापतीमुळेच वगळावे लागलेल्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. भारतीय संघातील इतके खेळाडू दुखापतग्रस्त का झाले, याचा आढावा घेण्याची गरज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले आहे.
दुखापतींचे स्वरूप
दुखापती हा कोणत्याही क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. एका सर्वेक्षणानुसार, ४१.३ टक्के दुखापती गोलंदाजी करताना, २८.६ टक्के क्षेत्ररक्षण किंवा यष्टिरक्षण करताना आणि अन्य फलंदाजी किंवा सराव करताना होतात. क्रिकेटमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारांत दुखापती मोडतात. शरीराच्या वरील भागात डोके, खांदा, कोपर आणि हात हे अवयव येतात. दुसरा भाग पोट, छाती, पाठ आणि कंबरेचा असतो, तर तिसऱ्या भागात गुडघा, पोटरी, घोटा, मांडी हे पायाचे अवयव येतात. आता या दुखापती कशा झाल्या, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. यापैकी काही मैदानी आहेत, काही गोलंदाजाचा चेंडू लागून झालेल्या आहेत, तर काही खेळाच्या ताणामुळे होतात. यापैकी पहिल्या दोन प्रकाराच्या दुखापती टाळता येत नाहीत. खेळाच्या ताणावर मात्र दुखापतींचे व्यवस्थापन हा उपाय आहे. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांना मैदानावर दुखापती झाल्या आहेत. परंतु रविचंद्रन अश्विनला निव्वळ खेळाच्या ताणामुळे दुखापतीला सामोरे जावे लागले आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ब्रिस्बेन कसोटीत नवदीप सैनीला दुखापत झाली, तर ऋषभ पंत आणि मयांक अगरवाल दुखापतींसह खेळत आहेत.
‘आयपीएल’मुळे दुखापती
इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सप्टेंबर ते नोव्हेंबर या चुकीच्या कालावधीत आयोजन केल्याने दुखापतींचे प्रमाण वाढले, असे विश्लेषण ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगरने केले. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ‘आयपीएल’मधील दुखापतींमुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकले नाहीत. रोहित दुखापतीतून सावरल्यामुळे अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाटी उपलब्ध होऊ शकला. वेगवान गोलंदाज वरुण चक्रवर्तीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड झाल्यानंतर तो दुखापतग्रस्त असल्याचे सिद्ध झाले. ‘आयपीएल’चा जसा फटका भारताला बसला, तसाच ऑस्ट्रेलियालाही बसला. धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉइनिस यांना ‘आयपीएल’मध्येच दुखापती झाल्या. याबाबत लँगरने रोखठोक भाष्य केले असताना भारताचे मातब्बर विश्लेषक मात्र मौन बाळगत आहेत.
सध्याचे भारतीय खेळाडू तिन्ही प्रकारचे क्रिकेट सातत्याने खेळत असतात. आमच्या वेळी फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच असायचे. पण क्रिकेटपटू रणजी, इराणी, दुलीप सामनेसुद्धा खेळायचे. त्यामुळे कपिल देव, रमाकांत देसाई, करसन घावरी यांना सामन्यात दुखापती कधी झाल्या, हेसुद्धा आठवत नाही. त्यावेळी धावणे, पोहणे हे तंदुरुस्तीसाठी आवश्यक असायचे. सध्या परदेशातून शिकलेले सरावतज्ज्ञ संघासाठी उपलब्ध आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा आढावा घेऊन त्यानुसार सरावाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.
-दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार
दुखापती खेळाडूंना होतच असतात. खेळाडू नियमित खेळत असतात, त्यावेळी ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सज्ज असतात. परंतु सहा-सात महिन्यांच्या करोनाच्या विश्रांतीमुळे त्यांचे एकूणच जीवनचक्र बिघडले. त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळे सामन्यांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. यापैकी असंख्य खेळाडू ‘आयपीएल’चे ट्वेन्टी-२० सामने खेळले. यातील दुखापतींसहच खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सामोरे गेले.
-सुलक्षण कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 1:39 am