करोनाचा फटका बसल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. बीसीसीआयने यासंबंधी अधिकृत घोषणा केली असून स्पर्धा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली नसून करोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरीत स्पर्धा घेता येईल का, कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

आयपीएलनेही ट्विट करत निवेदन प्रसिद्द केलं असून आयपीएल स्थगित करण्याचं कारण सांगितलं आहे. “आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसंच इतरांच्या सुरक्षेशी बीसीसीआय तडजोड करु इच्छित नाही. भागधारकांची सुरक्षा, आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला,” असं आयपीएलकडून सांगण्यात आलं आहे.

मोठी बातमी! करोनाच्या त्सुनामीचा ‘आयपीएल’ला तडाखा; संपूर्ण स्पर्धा स्थगित

“सध्या खूप कठीण काळ सुरु असून खासकरुन भारताला मोठा फटका बसला आहे. या काळात आम्ही काही सकारात्मकता आणि आनंद देण्याचा प्रयत्न केला. पण आता स्पर्धा स्थगित करणं तसंच प्रत्येकाने आपल्या कुटुंबीयांकडे आणि प्रिय व्यक्तींकडे जाणं अत्यावश्यक आहे,” असं सांगण्यात आलं आहे.

“आयपीएल २०२१ मध्ये सहभागी झालेल्या सर्वांत्या सुरक्षिततेसाठी तसंच सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी बीसीसीआय आपल्या सर्व अधिकारात प्रयत्न करेल. या अत्यंत कठीण परिस्थितीतही आयपीएल २०२१ आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, राज्य संघटना, खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, फ्रँचायजी, प्रायोजक, भागीदार आणि सेवा पुरवणाऱ्यांचे बीसीसीआय आभार मानू इच्छित आहे,” असंही म्हटलं आहे.