इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या गव्हर्निग काउन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत लोढा समितीच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शरद पवार आणि आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांनी बैठकीला हजेरी लावली होती. तसेच सौरव गांगुलीही या बैठकीला उपस्थित होता.  लोढा समितीने दिलेल्या निर्णयांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय ) अभ्यास करणार आहे. त्यासाठी आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने सट्टेबाजीच्या आरोपाअंतर्गत चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरवण्यासाठी आयपीएलची आज बैठक झाली. यामध्ये सध्यातरी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीने दिलेल्या शिफारसीनंतरच आयपीएलचा पुढला हंगाम कसा होणार, हे स्पष्ट होणार आहे.