युएईत होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाबाबत आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धे युएईमध्ये खेळवली जाणार आहे. गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात स्पर्धेच्या मुख्य स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीसीआयने VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा अशी लोकांची भूमिका होती. सोशल मीडियावर यासाठी दबावही वाढवण्यात आला होता.

सुरुवातीला जनमताचा आदर करत बीसीसीआयने यावर विचार करण्याची तयारी दाखवली. परंतू करोनामुळे सध्या निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात सध्याच्या घडीला VIVO कंपनीची स्पॉन्सरशीप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. VIVO आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांचा करार झाला असून प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून ४०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. बीसीसीआयच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ट्विटरवर #BoycottIPL हा हॅशटॅग ट्रेंडिंग करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

IANS वृत्तसंस्थेशी बोलत असताना बीसीसीआय अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली. “स्पॉन्सरशिप मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. याप्रकरणी आम्ही सर्व तांत्रिक आणि न्यायिक बाजू आम्ही तपासून पाहिल्या. यानंतर कायदेशीर सल्लागारांच्या मताप्रमाणे यंदाच्या हंगामात VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय अधिकाऱ्यांनी जनमताचा आदर ठेवत पुढील हंगामासाठी बीसीसीय नवीन कंपन्यांना स्पॉन्सरशिप देण्याबद्दल विचार करेल असं आश्वासन दिलं होतं.