देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआय स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. यासाठी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी जुलै महिन्यात नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने सर्व तयारी केली असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले होते. भारताचे माजी खेळाडू सुनिल गावसकर यांच्या मते सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेत आयपीएलचं आयोजन करणं शक्य आहे.

“काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांनंतर टी-२० विश्वचषकाचं आयोजन होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धा ठरल्याप्रमाणे झाल्यास सर्व संघांना नवीन नियमांचं पालन करण्याच्या दृष्टीकोनातून किमान ३ आठवडे आधी ऑस्ट्रेलियात पोहचावं लागेल. विश्वचषक स्पर्धा झाल्यास आयपीएल होण्याची शक्यता कमी आहे. पण ही स्पर्धा न झाल्यास सप्टेंबर महिन्यात श्रीलंका किंवा युएईमध्ये छोटेखानी आयपीएल खेळवता येईल.” गावसकर आज तक वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियातील काही निर्बंध शिथील करण्यात येत असल्याची घोषणा करत क्रीडा स्पर्धांना मान्यता दिली आहे. याचसोबत सामना पाहण्यासाठी मैदानाच्या एकूण क्षमतेपेक्षा २५ टक्के लोकांना प्रवेश दिला जाईल असंही मॉरिसन यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकाबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारने अद्याप आशा सोडलेल्या नसल्याचं चित्र पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय कॅबिनेट बैठकीत मॉरिसन यांनी क्रीडा, महोत्सव आणि कॉन्सर्ट यासाठी नवीन नियम जाहीर केले.

पावसामुळे सप्टेंबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करणं अशक्य आहे. पण श्रीलंकेत यादरम्यान छोटेखानी स्पर्धा खेळवता येईल. यासाठी सामन्यांची संख्या कमी करावी लागेल, यावर विचार करता येईल. गावसकरांनी आपलं मत मांडलं. दरम्यान बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामाची आयपीएल स्पर्धा बाहेर झाल्यास UAE क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयची पहिली पसंती असणार आहे.