देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. सध्या खेळाडू व इतर संबंधित लोकांचं आरोग्य महत्वाचं असून, स्पर्धा खेळवण्यासाठी योग्य वातावरण तयार झाल्यावरच IPL बद्दल विचार केला जाईल, असं गव्हर्निंक काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत सांगितलं. यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएल लंकेत खेळवण्याची ऑफर दिली.

“श्रीलंका भारताआधी या परिस्थितीतून बाहेर पडेल असं दिसत आहे. असं झाल्यास आयपीएल आम्ही श्रीलंकेत भरवू शकतो. यावर बीसीसीआयचं काय म्हणणं आहे याची आम्ही वाट पाहू.” श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मीसिल्वा यांनी राऊटर्सशी बोलताना माहिती दिली. लंकन क्रिकेट बोर्डाच्या या भूमिकेवर अखेरीस बीसीसीआयने आपली भूमिका मांडली आहे. सध्या संपूर्ण जग ठप्प झालेलं असताना, बीसीसीआय कोणत्याही गोष्टीवर अधिकृतरित्या बोलू शकत नाही. श्रीलंकेकडून सध्या कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये, त्यामुळे चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.

दरम्यान बीसीसीआयने आयपीएल स्थगित करताना परिपत्रकात आपली भूमिका मांडली. “या देशातील प्रत्येक नागरिक आणि आयपीएलशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचं आरोग्य चांगलं रहावं ही सध्या महत्वाची गोष्ट आहे. बीसीसीआय, आयपीएल संघमालक, प्रक्षेपण करणारी वाहिनी व इतर समभागधारक यांच्याशी चर्चा केल्यानंतर, स्पर्धेसाठी योग्य वातावरण तयार झालं तरच आयपीएल खेळवण्याबद्दल विचार केला जाईल”. अशी भूमिका गव्हर्निंग काऊन्सिलने मांडली आहे. बीसीसीआय सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, भविष्यात स्पर्धा सुरु करण्याबाबत विचार झाल्यास केंद्र, राज्य सरकार आणि सर्व संबंधित यंत्रणांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयच्या परिपत्रकात म्हटलं आहे.