इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पध्रेचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी सट्टेबाजी जोरात चालेल, अशी भीती अनेक संघटकांनी व्यक्त केली आहे. मात्र तसा प्रकार घडणार नाही, अशी खात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे.
भारतात लोकसभा निवडणुकांमुळे या स्पर्धेसाठी पुरेसे पोलीस संरक्षण देणे शक्य नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कळविण्यात आले. त्यामुळे आयपीएल संयोजकांनी सावधपणे स्पध्रेचा कार्यक्रम घोषित केला आहे. पहिला टप्पा अरब आखातात घेतला जाणार आहे. मात्र मॅच-फिक्सिंग, स्पॉट-फिक्सिंग व आखाती देशांमधील गुन्हेगारी जगाचे अतूट नाते असल्यामुळे या स्पर्धामध्ये असे प्रकार सर्रास होतील, अशी शंका व्यक्त करण्यात आली. मात्र मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीने या स्पर्धेत तसा कोणताही प्रकार होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार असल्याचे कळविले आहे. या समितीचे प्रमुख रवी सवानी यांनी सांगितले, ‘‘यापूर्वी सट्टेबाजी व अन्य स्वरूपाच्या फिक्सिंगचे जे प्रकार घडले आहेत, त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्याखेरीज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या शिफारशी, मुदगल समिती आदी विविध समित्यांचे अहवाल बारकाईने पाहणार आहोत व त्यानुसार योग्य ते पावले उचलली जाणार आहेत.’’
‘‘भ्रष्टाचार व अन्य अवैध प्रकारांना सामोरे जाण्याची क्षमता आमच्या समितीकडे आहे. आम्ही आखाती देशांमधील स्पर्धेसाठी जास्त व्यक्तींची मदत घेणार आहोत. त्या देशात यापूर्वीही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्या सामन्यांचे अहवालही आम्ही पाहणार आहोत,’’ असेही सवानी यांनी सांगितले.