आयपीएल चौकशी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती मुकुल मुद्गल यांनी इंग्लंडमध्ये जाऊन भारतीय खेळाडूंशी सुसंवाद साधणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘‘आयपीएलच्या चौकशी संदर्भात समिती किंवा समितीचा कोणताही सदस्य भारत सोडून परदेशामध्ये खेळाडूंशी सुसंवाद करायला जाणार नाही. मलिका सुरू असताना खेळाडूंशी सुसंवाद साधल्यास त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणण्याचा आमचा मानस नाही,’’ असे समितीच्या वतीने बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
समिती सदस्यांनी या वेळी बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष आणि आयसीसीचे कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन यांच्याकडून माहिती घेतली नसल्याचेही स्पष्ट केले. आयपीएलमध्ये सट्टेबाजीच्या आरोपाखाली मयप्पनला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
‘‘१५ आणि १६ ऑगस्टला चौकशी समिती सदस्य चेन्नईमध्ये एकत्र भेटले होते. या वेळी त्यांनी अन्य चौकशी करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला. या वेळी श्रीनिवासन आणि मयप्पन यांच्याशी कोणताही संपर्क साधला नाही,’’ असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे.