करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका भारतात बीसीसीआयलाही चांगलाच बसला आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला. मात्र यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीायला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलचा तेरावा हंगाम यंदाच्या वर्षीच खेळवला जाईल असं सुतोवाच केलं. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आयपीएल खेळवावं का यावरुन गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर अनेक चर्चा झाल्या. पण आयपीएल हे केवळ मनोरंजन नसून हा एक व्यवसाय आहे. यावर अनेक जणांचा रोजगार अवलंबून असतो असं मत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी व्यक्त केलं आहे.

“मला असं ठामपणे वाटतं की आयपीएलमुळे देशातली परिस्थिती बदलण्यास मदत होईल. काही लोकं असंही म्हणतील की बीसीसीआयला फक्त आयपीएलची चिंता आहे, कारण यामध्ये पैसा आहे…अशीही टीका आमच्यावर होते आणि होत राहिल. पण या स्पर्धेमागे असलेलं अर्थचक्र कोणीही समजावून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. आयपीएल ही स्पर्धा केवळ मनोरंजन म्हणून खेळवली जात नाही, हा एक व्यवसाय आहे. या स्पर्धेमुळे अनेक भागांमध्ये रोजगार निर्मिती होते. या स्पर्धेवर अनेक लोकांचा रोजगार अवलंबून असतो. ही स्पर्धा झाली तरच खेळाडूंना त्यांचं मानधन मिळू शकतं. पण ही स्पर्धा झाली नाही, तर संपूर्ण वर्षभरातल्या स्पर्धांच्या आयोजनावर फरक पडू शकतो. आयपीएलमधून बीसीसीआयला सर्वात जास्त पैसा मिळतो. आयपीएलमुळे देशभरात बीसीसीआय २ हजारपेक्षा जास्त स्थानिक सामने खेळवतं. एका अर्थाने देशातील प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा खेळवली जाणं महत्वाचं आहे. ऑस्ट्रेलियात यंदा टी-२० विश्वचषकाचं आयोजन होणार असेल तर अर्थातच आम्ही त्याच्यात सहभागी होऊ. पण हे आयोजन होणार नसेल तर याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेतला जावा ज्यामुळे पुढच्या तयारीला लागता येईल.” धुमाळ इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

काही दिवसांपूर्वी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी, बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. याचसोबत यंदाचा हंगाम भारताबाहेरही खेळवण्याच्या पर्यायावर बीसीसीआय विचार करत आहे. मात्र यावर लगेच माहिती देणं योग्य ठरणार नाही असं धुमाळ म्हणाले. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत देशातली परिस्थिती काय आहे, सरकार काय नियम तयार करतंय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रवासाची परवानगी मिळते की नाही या सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल आणि यानंतर यावर ठोस निर्णय घेता येईल असं धुमाळ म्हणाले.