पुण्याच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर झालेल्या पुणे विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईने पाच खेळाडू राखून पुणे वॉरियर्सवर विजय मिळवला. पुणे वॉरियर्स संघाच्या अवघ्या ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर स्मिथ बाद झाला आणि मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजीवर दबाव निर्माण करता आला. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि सचिन तेंडुलकरने सावध भूमिका घेत फलंदाजी करण्यास सुरूवात केली खरी परंतु पाचव्या षटकात अजंता मेंडीसच्या फिरकी गोलंदाजीवर सचिन तेंडुलकर झेलबाद झाला. दिनेश कार्तिकही आठव्या षटकात बाद झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या ३९/३ अशी होती. त्यानंतर कर्णधार रोहीत शर्माने कर्णधारी खेळी करत रायडूच्या सोबतीने संघाच्या डावाला सावरण्यास सुरूवात केली. सामन्याच्या सरते शेवटी मुंबई इंडियन्सचा पाच खेळाडू राखून विजय झाला.
पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता . रॉबीन उथप्पा आणि फिन्चने चांगली सुरूवात केली परंतु चौथ्या षटकात फिन्च झेल बाद झाला. त्यानंतर पाचव्या षटकात उथप्पाही माघारी परतला. युवराज सिंगने संघाची मदार सांभाळण्यास सुरूवात केलेली. युवराजने ११ व्या षटकात प्रग्यान ओझाच्या दुस-या आणि तिस-या चेंडूवर लागोपाठ दोन षटकार लगावले आणि षटकांच्या नुसार कमी असलेली धावसंख्या भरून काढण्यास सुरूवात केली. परंतु युवराजला उत्तम साथ मिळत नव्हती, इतर फलंदाज अगदी स्वस्तात बाद होत  होते. युवराज सिंगही हरभजन सिंगच्या फिरकी गोलंदाजीवर बाद झाला. त्यावेळी पुण्याची धावसंख्या ८५/५ अशी होती. युवराज नंतर उतरलेले फलंदाज फक्त मैदानात हजेरी लावून तंबूत परतत होते. वीस षटकांच्या अखेरीस पुणे वॉरियर्सची धावसंख्या ११२/८ बाद अशी होती.