आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आयपीएल फिक्सिंगशी संबंध जोडणाऱया पोलीस अधिकाऱयाला लाच घेतल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी जी.संपत कुमारने महेंद्रसिंग धोनीचा आयपीएल फिक्सिंगशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या अधिकाऱयाला आयपीएलमधील सट्टेबाजाकडून ५० लाखांची लाच घेऊन त्याला सोडल्याबद्दलच्या आरोपावरून निलंबीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणी कुमार यांना अटक होण्याचीही शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
संपत कुमारने चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख गुरूनाथ मय्यपन आणि किटी नावाचा सट्टेबाज यांच्याशी धोनी संपर्कात असल्याचा दावा केला होता. तसेच किटी या बुकीच्या आग्रहाखातर मय्यपन, धोनी आणि सुरेश रैनाला भेटल्याचाही खुलासा कुमार यांनी केला होता. आता या पोलीस अधिकाऱयाचे आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी आरोपी असलेल्या सट्टेबाजाकडून लाच घेतल्याप्रकरणी निलंबन करण्यात आले आहे.