वानखेडेच्या १० देखरेख कर्मचाऱ्यांना आणि संयोजन समितीच्या सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना आणि सहा संयोजन समितीच्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांबाबतची चिंता वाढली आहे. परंतु अल्पसूचनेद्वारे पर्यायी ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे मुंबईतील सामने अन्यत्र हलवता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.

राज्यातील करोनाबाधितांची संख्यासुद्धा वेगाने वाढत असून, शुक्रवारी ४७,९१३ रुग्ण आढळले. या पार्श्वभूमी वर टाळेबंदी किंवा कठोर र्निबधांचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईत १० ते २५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या १० ‘आयपीएल’ सामन्यांबाबतही साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु सद्य:स्थितीचा आढावा घेऊन हैदराबाद आणि इंदूर या ठिकाणी सामन्यांचे स्थलांतरण करण्यासंदर्भात ‘बीसीसीआय’कडून विचार करण्यात आला.

‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही या परिस्थितीबाबत चिंता प्रकट केली आहे. ‘‘हैदराबादचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत. परंतु सर्व संघ जैव-सुरक्षित वातावरणात आहेत आणि ‘आयपीएल’ सामने प्रेक्षकांविना होणार आहेत. त्यामुळे राज्यात टाळेबंदी लागू झाली तरी मुंबईतील सामन्यांबाबत आम्हाला खात्री आहे. १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील पहिला सामना कार्यक्रमपत्रिकेनुसार होईल,’’ असे सूत्रांनी सांगितले.

दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज या संघांना वानखेडेवर सरावाची परवानगी नाही. दिल्ली आणि पंजाबचा अनुक्रमे ब्रेबॉर्न स्टेडियम आणि शरद पवार अकादमी येथे सराव सुरू आहे. चेन्नईत सामने खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सचे नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. स्टेडियमवर सामने सुरू आहेत.

गतवर्षीपर्यंत स्पर्धा संयोजनाची जबाबदारी ‘आयएमजी’कडे होती. परंतु यंदाच्या वर्षीपासून ‘बीसीसीआय’ स्वत:च हे कार्य पार पाडत आहे. ‘‘मुंबईतील परिस्थिती हाताळण्यासाठी आमच्याकडे

पुरेशी व्यवस्था आहे. परंतु सध्या तरी आम्ही परिस्थितीचा सखोल आढावा घेत आहोत,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

दिल्ली कॅपिटल्सचा पटेल करोनाबाधित

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेलला शनिवारी करोनाची लागण झाली आहे. नितीश राणानंतर करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आलेला अक्षर हा ‘आयपीएल’मधील दुसरा क्रिकेटपटू आहे. नितीशचा आधी करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता, परंतु त्याची दुसरी चाचणी नकारात्मक आली आहे. ‘‘अक्षर २८ मार्चला मुंबईत संघाचा निवास असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाला. त्या वेळी त्याची चाचणी नकारात्मक आली होती. परंतु दुसऱ्या कोविड चाचणीचा अहवाल मात्र सकारात्मक आला आहे,’’ असे दिल्ली कॅपिटल्सने स्पष्ट केले.

मुस्ताफिझूर पहिल्या दोन सामन्यांना मुकणार

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रेहमान ‘आयपीएल’मधील पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. मुस्ताफिझूर सध्या बांगलादेश संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर असून, अखेरच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत खेळणार नाही. मुस्ताफिझूर ५ एप्रिलला भारतात दाखल होणार असून, त्यानंतर त्याला सात दिवसांच्या अनिवार्य विलगीकरणाला सामोरे जावे लागेल.

जेतेपदाच्या हॅट्ट्रिकची सुवर्णसंधी!

‘आयपीएल’मधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून ख्याती असलेल्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक साकारण्याची सुवर्णसंधी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कौशल्यवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या कारकीर्दीला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करणाऱ्या मुंबईने जसप्रीत बुमरा, हार्दिक-कृणाल पंडय़ा, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे या वेळी कोणत्या बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूला मुंबई पैलू पाडणार, हे पाहणे रंजक ठरेल. युवा डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर या हंगामात मुंबईकडून पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय क्विंटन डीकॉक, किरॉन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिल्ने, ख्रिस लीन असे एकापेक्षा एक सरस अनुभवी विदेशी खेळाडू ताफ्यात असल्याने मुंबईचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी अन्य संघांना कठोर परिश्रम करावे लागतील.

संघ : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिल्ने, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स नीशाम, नॅथन कोल्टर-नाइल, पीयूष चावला, सौरभ तिवारी, अर्जुन तेंडुलकर, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, मोहसिन खान, युधविर चरक, मार्को जान्सेन. ल्ल मुख्य प्रशिक्षक : महेला जयवर्धने.

मुंबई इंडियन्स

 कर्णधार : रोहित शर्मा

सर्वोत्तम कामगिरी  : विजेतेपद (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०)

 मुख्य आकर्षण : अर्जुन तेंडुलकर