२९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा तेरावा हंगाम बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलला. देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता स्पर्धा खेळवायची की नाही यावर निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं. भारतामधली सध्याची परिस्थिती पाहता, यंदाच्या हंगामाची स्पर्धा ही रद्द होण्याची शक्यता काही संघमालक आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र भारतीय संघाचा सलामीवीर आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलबद्दल अजुनही आशावादी आहे.

परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवला जाऊ शकतो असं रोहित शर्माने म्हटलं आहे. इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पिटरसनसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट दरम्यान रोहितने आयपीएलबद्दल वक्तव्य केलं. बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार २९ मार्चला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार होता. मात्र करोना विषाणूने घातलेल्या धुमाकूळ पाहता, बीसीसीआयने स्पर्धा १५ एप्रलिपर्यंत पुढे ढकलली आहे.

दरम्यान, रोनाल्डो,मेसी या फुटबॉलपटूंनीही करोनाविरुद्ध लढ्यात मदत दिलेली आहे. भारतामध्येही अनेक खेळाडू करोनाविरुद्ध लढ्यात आपली जबाबदारी बजावत आहेत. भारतासह जगभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अनेक महत्वाच्या क्रीडा स्पर्धा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. यंदा टोकियो शहरात होणारं ऑलिम्पिकही २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलंय.