IPL ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील खेळाडू खेळतात. आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय खेळाडूंना जवळून पाहता यावे, त्यांच्या खेळाचे कौतुक करता यावे यासाठी मोठ्या संख्येने चाहता वर्ग IPL सामन्यासाठी उपस्थित राहतो. पण यामुळे गोंगाट होतो म्हणून गोंगाटामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर दंड ठोठवावा अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. पण IPL म्हंटलं की स्टेडियममध्ये गोंगाट व्हायचाच’ असे सांगत ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

क्रिकेट सामन्यांदरम्यान चौकार-षटकार मारल्यानंतर वा फलंदाजाला बाद केल्यावर त्याचा आनंदच साजरा केला जातो आणि सामना पाहणाऱ्याला आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत आयपीएल सामन्यांदरम्यान ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

विशेष म्हणजे याचिकाकर्ता दहिसर येथे राहतो. म्हणजे दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमपासून ४० किमी दूर राहतो. असे असताना वानखेडेवरील सामन्यादरम्यान होणाऱ्या आवाजाचा त्याला त्रास कसा काय होऊ शकतो? असा सवाल करत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले.

कपिल सोनी या वकिलाने २०१४ मध्ये याचिका केली होती. वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यांदरम्यान ध्वनिक्षेपक लावले जातात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केले जाते. हे सामने रात्री ८ वाजता सुरू होतात आणि मध्यरात्रीपर्यंत चालतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मैदानावर आणि परिसरात गोंगाट असतो, असा आरोप सोनी यांनी याचिकेत केला होता. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर (एमसीए) ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्यांना भरमसाट दंड आकारण्याची मागणी केली होती.

सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान एखाद्या फलंदाजाने चौकार वा षटकार मारल्यास किंवा एखादा फलंदाज बाद झाल्यास लोक आनंद साजरा करतात. त्यांना तो अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.