भारतीय संघ ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारताचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळणार आहे. पण ही मालिका झाल्यानंतर मात्र वेस्ट इंडिजचा एक खेळाडू आणि रोहित शर्मा हे एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. IPL चे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने पुढच्या हंगामाला सुरुवात केली आहे. फिरकीपटू मयंक मार्कंडे याला मुंबई इंडियन्सने सोडचिट्ठी दिली असून त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा धडाकेबाज युवा शेर्फाने रुदरफोर्ड याला चमूत दाखल करून घेण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाशी हस्तांतरण प्रक्रियेच्या माध्यमातून हा व्यवहार करण्यात आला.

मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी म्हणाले की मयांक हा प्रतिभावान खेळाडू आहे. तो आमच्या संघातील खेळाडू होता याचा मला अभिमान आहे. हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु मयांकच्या भल्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो भविष्यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार असेल. मयांकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच रुदरफोर्डला चमूत दाखल करून घेण्याचा आनंदही आहे.

२० वर्षीय रुदरफोर्डने वेगवेगळ्या टी २० लीगमध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्याने गेल्या वर्षी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कॅरेबियन प्रीमिअर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि ग्लोबल टी २० लीग या स्पर्धांमध्ये त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोनही प्रकारात त्याने आपली छाप पाडली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १७ सामन्यांमध्ये ४८६ धावा केल्या आहेत आणि ३३ बळी माघारी धाडले आहेत.

दरम्यान, मुंबईच्या संघातून लेंडल सिमन्स, ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड, एव्हिन लुईस, अल्झारी जोसेफ या खेळाडूंनी आतापर्यंत आपली चमक दाखवली आहे.