सध्या स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ उत्सुक आहे. मात्र संपूर्ण जग बंदिस्त असताना ‘आयपीएल’ खेळवण्याचा विचार आम्ही करत नाही, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील वजनदार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.

‘आयपीएल’ २९ मार्च ते २४ मे या कालावधीत खेळवण्यात येणार होती. पण करोनाचा कहर वाढल्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. देशातील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ही स्पर्धा खेळवण्याचा आमचा विचार नाही, असे ‘बीसीसीआय’चे म्हणणे आहे.

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी गुरुवारी ‘आयपीएल’ श्रीलंकेत खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता. श्रीलंकेत करोनाची बाधा झालेले रुग्ण फार कमी असून भारताच्या तुलनेत श्रीलंकेतील परिस्थिती लवकर पूर्वपदावर येऊ शकते, असे सिल्वा यांचे म्हणणे होते. गॉल, कँडी आणि प्रेमदासा स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळवण्याचा श्रीलंका मंडळाचा प्रस्ताव आहे.

‘‘श्रीलंका मंडळाकडून अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यासही, त्यावर व्यवहार्यपूर्ण चर्चा कधी होईल, याची कोणतीही शाश्वती नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सध्या ‘बीसीसीआय’ने सप्टेंबर-ऑक्टोबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत देशातच ‘आयपीएल’ खेळवण्याचे ठरवले आहे. पण मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदावरून शशांक मनोहर पायउतार होतील, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल, असे एका ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ सदस्याचे म्हणणे आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका देश ‘बीसीसीआय’ला नेहमीच मदत करत आला आहे, त्यामुळे त्यांचा प्रस्ताव समजण्यासारखा आहे. पण मनोहर पुढील महिन्यात सर्वोच्च पदावरून पायउतार झाल्यानंतर काय होईल, हे सांगता येणार नाही. त्यानंतर चर्चेसाठी बसल्यावर नवनवीन पर्याय समोर येतील. फक्त श्रीलंकाच नव्हे तर अन्य पर्यायांचाही विचार करावा लागेल,’’ असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.