भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कोणत्याही परिस्थितीत यंदा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन करण्यासाठी आग्रही आहे. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतरही देशात ही स्पर्धा आयोजित करण्यात अडचणी निर्माण होत असल्यास ‘बीसीसीआय’ ही स्पर्धा भारताबाहेर खेळवण्याचा शेवटचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.

‘आयपीएल’ भारतातच खेळवण्याला ‘बीसीसीआय’ची पसंती आहे. मात्र भारतात ही स्पर्धा घेणे शक्य नसल्यास, ती देशाबाहेरही खेळवण्याला ‘बीसीसीआय’ची तयारी आहे. ‘‘सध्या ‘बीसीसीआय’ सर्व पर्याय पडताळून पाहत आहे. ‘आयपीएल’ भारताबाहेर खेळवायची असेल तर तो आमच्यासाठी शेवटचा पर्याय असेल. जर हा शेवटचा पर्याय असेल तर आम्ही त्यावर नक्कीच विचार करू. आम्ही याआधीही ‘आयपीएल’चे आयोजन भारताबाहेर केले असून गरज पडल्यास यापुढेही त्याबाबतचे पाऊल उचलले जाईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘आयपीएल’ आयोजनाबाबतचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नसून ‘बीसीसीआय’ ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निर्णयाची वाट पाहत आहे. ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर टाकण्याबाबतची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी समितीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आता १० जून रोजी होणाऱ्या ‘आयसीसी’च्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

‘आयपीएल’च्या १३व्या पर्वाला २९ मार्च रोजी सुरुवात होणार होती. मात्र करोनामुळे ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली. जगभर करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर संपूर्ण विश्वातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. अनेक देशांतील फुटबॉल स्पर्धाना सुरुवात झाली असून या महिन्यापासून बऱ्याचशा क्रिकेट दौऱ्यांना सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास तयार झाला आहे.

लोकसभा निवडणुकांमुळे यापूर्वी ‘आयपीएल’ दोन वेळा भारताबाहेर खेळवण्यात आली आहे. २००९मध्ये पहिल्यांदा ‘आयपीएल’ दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. त्यानंतर २०१४मध्ये संयुक्त अरब अमिरातीत पहिला टप्पा पार पडल्यानंतर ‘आयपीएल’चा दुसरा टप्पा भारतात खेळवण्यात आला होता. आता सहा वर्षांनंतर पुन्हा ‘आयपीएल’ भारताबाहेर खेळवण्याची वेळ ‘बीसीसीआय’वर ओढवल्याची चिन्हे दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियात स्पर्धात्मक क्रिकेट शनिवारपासून

ऑस्ट्रेलियात शनिवार-रविवारपासून ट्वेन्टी-२० स्पर्धेद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात होत आहे. करोनामुळे तीन महिने क्रिकेटही पूर्णपणे ठप्प आहे. मात्र डार्विन येथे मोजक्या ५०० प्रेक्षकांच्या उपस्थितीत १५ लढतींच्या ट्वेन्टी-२० स्पर्धेला सुरुवात होत आहे. डार्विन हा भाग ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला येतो. त्या ठिकाणी २१ मेनंतर करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या स्थितीत तेथे क्रिकेट सुरू करण्याचा निर्णय डार्विन क्रिकेट संघटनेकडून घेण्यात आला आहे.