इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल) या लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या दहाव्या मोसमाचा श्रीगणेशा बुधवारी होत आहे. पुढील जवळपास दीड महिना झटपट क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. क्रिकेट विश्वात आयपीएल या स्पर्धेला लोकप्रियता, मनोरंजन, थरार असे एक वेगळेच वलय आहे. स्पर्धेची लोकप्रियता लक्षात घेता त्यासाठी तितकीत जोरदार तयारी देखील आयोजकांकडून केली जाते. सध्याच्या ‘सोशल’ जगात टेक्नोसॅव्हींना काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशाने आयपीएलसाठी खेळाडूंचे इमोजी वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

सोशल मीडियावर सध्या इमोजींचा वापर वाढला आहे. त्यात ट्विटर म्हटलं की आपल्या भावना मोजक्या शब्दांत मांडव्या लागतात. त्यामुळे केवळ शब्दांमध्ये मर्यादित न राहता ट्विटरने आपल्या युजर्सना इमोजीचा पर्याय उपलब्ध करून दिला. आयपीएलकडून महत्त्वाच्या खेळाडूंचे इमोजी तयार करण्यात आले आहेत. खेळाडूंचा हॅशटॅग तयार करून हे इमोजी ट्विटरवर वापरता येणार आहेत.
विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, ख्रिस गेल, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, धोनी, स्मिथ या खेळाडूंच्या इमोजींना ट्विटर सध्या चांगली पसंती मिळत आहे.

आयपीएलच्या या मोसमात आज पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनराजर्स हैदराबाद असा होणार आहे. विराट कोहली मात्र सुरूवातीचे काही सामन्यांना दुखापतीमुळे मुकणार आहे. त्यामुळे बंगळुरू संघाचे नेतृत्त्व आज शेन वॉटसनकडे असणार आहे. दोन्ही संघ मागील पर्वातील अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले संघ आहेत. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.