इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) चिनी प्रायोजकांसह केलेले सर्व करार रद्द करून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. चिनी प्रायोजकांशिवायही ‘आयपीएल’चे आयोजन शक्य आहे, अशी प्रतिक्रिया ‘आयपीएल’मधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी मंगळवारी व्यक्त केली.

भारत-चीन यांच्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने देशभरातून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’ने चिनी प्रायोजकांसह संबंध ठेवू नयेत, असे ४९ वर्षीय वाडिया यांना वाटते.

‘‘चिनी प्रायोजकांशी असलेले सर्व करार ‘आयपीएल’ने रद्द करावेत. सध्याची स्थिती पाहता आपल्या देशासाठी किमान इतके योगदान तरी ‘आयपीएल’ने देणे अपेक्षित आहे. यंदाच्या ‘आयपीएल’विषयी अद्याप संभ्रम कायम असल्याने पुढील वर्षांपर्यंत चिनी प्रायोजकांवर पूर्णपणे निर्बंध घालण्याचा प्रयत्न करावा,’’ असे वाडिया म्हणाले.

‘‘आयपीएल ही भारतातील क्रिकेट स्पर्धा असून यामध्ये चिनी प्रायोजकांचा समावेश नसला तर ते देशासाठीच लाभदायक ठरेल. चिनी उत्पादकांचा तसेच प्रायोजकांचा भारतातील क्रीडा क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्वरित यावर बंदी घालणे शक्य नसले तरी आतापासूनच याची सुरुवात करणे आवश्यक आहे. ‘आयपीएल’ला आर्थिक नफा मिळवून देण्यासाठी भारतामध्ये अनेक नामांकित प्रायोजक उपलब्ध असून यामुळे अधिकाधिक भारतीय उद्योगपतींना क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास प्रेरणा मिळेल. त्यामुळे चिनी प्रायोजकांशिवायही आपण ‘आयपीएल’चे नक्कीच उत्तम आयोजन करू शकतो,’’ असेही वाडिया यांनी सांगितले.